Advertisement

तिरट जुगार खेळणाऱ्या ६ जणांना अटक, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रजापत्र | Sunday, 04/10/2026
बातमी शेअर करा

बीड : शहर व जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून जोरदार मोहीम सुरू असतानाच, स्थानिक गुन्हे शाखेने बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवगण राजुरी येथील 'राज हॉटेल लॉज'वर धडक कारवाई केली. शनिवारी (दि. ३ ऑक्टोबर) रात्री आठ वाजेच्या सुमारास टाकलेल्या या छाप्यात तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या सहा जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल २ लाख १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नवगण राजुरी येथील राज हॉटेल लॉजमध्ये काही इसम बेकायदेशीररीत्या जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खात्री करून पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. त्यावेळी सहा इसम पैशांवर तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून २ लाख १८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील श्रीराम खटावकर, हवालदार आनंद मस्के, विकास राठोड, गोविंद राख, बबन सलगर, मनोज परजणे आणि नितीन वडमारे यांनी पार पाडली.

Advertisement

Advertisement