Advertisement

बोंबला... आता महागाईने त्रस्त जनता 'गॅस'वर

प्रजापत्र | Monday, 15/02/2021
बातमी शेअर करा

बीड-देशभरात पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईने वाहनधारकांच्या खर्चात प्रचंड वाढ केलेली असताना आता घरगुती वापराचा गॅस सिलिंडर सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून टाकणार आहे. सोमवारपासून (दि.१५) घरगुती वापराचा गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागले आहे. बीडमध्ये गॅस सिलेंडरसाठी ७९५ रुपये आता ग्राहकांना मोजावे लागतील. डिसेंबरनंतर गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही चौथी दरवाढ आहे. तर मागील दहा दिवसांत ७५ रुपयांनी तर दीड महिन्यात पावणे दोनशे रुपयांनी गॅस महागला.
                  कोरोना रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधन दर निश्चित केले जातात. तर गॅस सिलिंडरच्या किमतीचा दर १५ दिवसांनंतर किंवा महिनाभराने आढावा घेतला जातो. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि चलन विनिमय यानुसार कंपन्या किरकोळ विक्रीसाठी इंधन दर निश्चित करतात. देशभरात २८ कोटी ७० लाख एलपीजी ग्राहक आहेत.
सोमवार मध्यरात्रीपासून बीडमध्ये गॅस खरेदीसाठी ग्राहकांना ७९५ रुपये मोजावे लागले. त्यामध्ये ५० रुपयांची वाढ झाली.त्यामुळे आता सिलिंडर आठशे रुपयांचा घरात गेले आहे.दरम्यान वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. 

सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले
पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असतानाच घरगुती गॅस सिलिंडरनेही जोराचा झटका दिलेला आहे. या दरवाढीचा फटका विनाअनुदानित गॅस सिलिंडर घेणाऱ्यांना बसत आहे. अनुदानित गॅस सिलिंडरधारकांना मिळणारी सबसिडीसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

 

दीड महिन्यात पावणेदोनशेची वाढ 
गॅस सिलिंडरच्या किंमतीत डिसेंबरपासून वाढ होत आहे. १ डिसेंबर २०२० रोजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १६ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा सिलिंडर ५० रुपयांनी महागले. त्यानंतर ४ फेब्रुवारी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा १५ फेब्रुवारीपासून सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे.

 

Advertisement

Advertisement