धाराशिव : जिल्ह्यात उद्भवलेल्या तीव्र स्वरूपाच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रत्येक तालुक्यातील छोट्या मोठ्या गावात जाऊन ‘घोंगडी बैठका’ घेत आहेत. रात्रीच्या वेळी थेट गावशिवारात जाऊन शेतकरी बांधवांशी अगदी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी, व्यथा आणि समस्या जाणून घेतल्या जात आहेत. संकटाच्या काळात शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये, आपलं महायुती सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास या बैठकांमधून दिला जात आहे.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक गावात नोडल अधिकारी नेमण्याची, तसेच तक्रारींची ऑनलाइन नोंद करून त्यांचा पाठपुरावा करण्याची यंत्रणा राबवण्यावर भर दिला जात आहे. शेतकरी बांधवांनीही आपल्या अडचणी मनात न ठेवता प्रशासनासमोर मोकळेपणाने मांडाव्यात, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे. शेतकरी एकटा नाही, आपलं शासन आणि प्रशासन त्याच्या पाठीशी आहे आणि संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकमेकांना आधार दिला पाहिजे, हा विश्वास या घोंगडी बैठकांमधून रुजवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जात आहे.
शेतकरी बांधवांना केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष संवादातून दिलासा देत त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून हा पुढाकार घेतला जात आहे. त्याला गाव खेड्यातील शेतकरी बांधवांच्या मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी, मनातील नैराश्य दूर करण्यासाठी आणि संकटावर एकजुटीने मात करण्यासाठी गावागावांत संवादाची ही चळवळ मोठ्या जोमाने उभी राहत आहे.

