Advertisement

बीड कारागृह बनले 'हाय-टेक' किल्ला!

प्रजापत्र | Friday, 02/10/2026
बातमी शेअर करा

बीड दि. २ (प्रतिनिधी ) ; बीड जिल्हा कारागृहातून वाल्मिक कराडने विलास घुले खून प्रकरणात आपल्या मुलाला गोवण्याचा कट रचला होता आणि वाल्मिक कराड कारागृहात अनेक मोबाईल आणि सिम कार्ड वापरात असल्याचा खळबळजनक दावा बीडचे खा. बजरंग सोनवणे यांनी केला होता. त्याला आता कारागृह प्रशासनाने उत्तर दिले असून बीडच्या संपूर्ण कारागृहावर हायटेक कॅमेऱ्यांची नजर आहे, तसेच कारागृहातून काडी फोनवर बॉलर असताना कॉन्फरन्स कॉल करण्याची यंत्रणा देखील रोखण्यात  करण्यात आलेली असल्याचे कारागृह अधीक्षक रामराव चांदणे यांनी म्हटले आहे. 
कारागृह अधीक्षक रामराव चांदणे यांनी स्पष्ट केले आहे की, बीड कारागृह आता पूर्णपणे सीसीटीव्हीच्या निगराणीत आहे. संपूर्ण कारागृहात तब्बल २०६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरलेले आहे. एकाच बराकीत ५० ते ५५ कैदी असतात; अशा स्थितीत एखाद्याने छुप्या पद्धतीने मोबाईल वापरल्यास इतर कैद्यांमध्ये नक्कीच गोंधळ उडेल. त्यामुळे मोबाईलचा वापर आणि त्यातून कट रचल्याचा दावा प्रशासनाने पूर्णपणे फेटाळला आहे.कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा, १० मिनिटांसाठी केवळ पोलिसांकडून प्रमाणित केलेल्या ३ नातेवाईकांशीच बोलण्याची परवानगी असते (ज्याला 'ॲलन कॉल' म्हणतात). या सिस्टीममध्ये स्क्रीनवर केवळ ते तीनच नंबर दिसतात, दुसरा कोणताही नवीन नंबर डायल करता येत नाही. पूर्वी या सिस्टीममध्ये एक त्रुटी होती. कैद्याने घरच्यांना फोन लावल्यानंतर, नातेवाईक तो कॉल तिसऱ्याच व्यक्तीला 'कॉन्फरन्स'वर जोडत असत, ज्यावर प्रशासनाचे नियंत्रण नव्हते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने आता मोठे पाऊल उचलण्यात आले असून, गेल्या चार महिन्यांपासून या यंत्रणेतील 'कॉन्फरन्स कॉल'ची सुविधा पूर्णपणे ब्लॉक करण्यात आली आहे. याआधी झालेल्या दोन उच्चस्तरीय चौकश्यांमध्येही प्रशासनाच्या कारभारात कोणतीही त्रुटी आढळलेली नाही. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान आणि कडक नियमांमुळे बीड कारागृहातून कोणताही कट रचणे शक्य नसल्याचे प्रशासनाने   स्पष्ट केले आहे. खा. बजरंग सोनवणे यांनी केलेल्या आरोपांनंतर आता कारागृह प्रशासनाने आरोप फेटाळणारी माहिती दिली आहे. 
---
 वाल्मिक कराडच्या बारकीवर १२ कॅमेरे 
वाल्मिक कराडला कारागृहात वेगळी वागणूक मिळते असा देखील आरोप अनेकदा करण्यात आला यावर देखील  कारागृह प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली असून ज्या वाल्मिक कराडवर मोबाईल वापरल्याचा आरोप होत आहे, केवळ त्याच्याच बराकीवर १२ 'हाय-टेक' कॅमेऱ्यांची २४ तास करडी नजर असल्याचे म्हटले आहे. 
----
 ------------------------------------------------------

Advertisement

Advertisement