नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी बॉक्सिंग रिंगमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. २ ऑक्टोबर रोजी भारताला एकामागून एक सलग तीन सुवर्णपदके मिळाली असून, बॉक्सिंगमध्ये भारताने 'सुवर्ण हॅटट्रिक' साजरी केली आहे. या तीन दमदार विजयांसह आशियाई क्रीडा स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताच्या सुवर्णपदकांचा आकडा आता १४ वर पोहोचला आहे. लव्हलिना बोरगोहेन, परवीन हुड्डा आणि अंकुश पंघाल या तीन शिलेदारांनी भारताला ही सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.
स्वतःलाच दिले वाढदिवसाचे 'सुवर्ण' गिफ्ट: लव्हलिना बोरगोहेन
भारताच्या सुवर्णवेध मोहिमेची सुरुवात लव्हलिना बोरगोहेनने केली. महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तिने २०२६ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या चीनच्या बाओ झियीचा ५-० असा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, विजयाच्या दिवशीच लव्हलिनाचा वाढदिवस होता. या एकतर्फी विजयाद्वारे तिने स्वतःलाच सुवर्णपदकाची अविस्मरणीय भेट दिली. याआधी २०२२ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने मिळवलेल्या रौप्यपदकाचे रुपांतर आता तिने सुवर्णात केले आहे.
बंदीची कटू आठवण पुसत परवीन हुड्डाची सुवर्णभरारी**
लव्हलिनाच्या पाठोपाठ परवीन हुड्डानेही शानदार खेळ करत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. शुक्रवारी रंगलेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत परवीनने पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या चेन निएन-चिन (चायनीज तैपेई) हिच्यावर ३-२ अशा फरकाने निसटता विजय मिळवला. याआधी उपांत्य फेरीत तिने चीनच्या ली शू हिचा ५-० असा पराभव केला होता. परवीनचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत आव्हानात्मक राहिला आहे. 'व्हेअरअबाउट्स फेल्युअर' (Whereabouts failure) प्रकरणी इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (ITA) तिच्यावर २२ महिन्यांची बंदी घातल्याने तिचे मागील हांगझोऊ स्पर्धेतील कांस्यपदक काढून घेण्यात आले होते. मात्र, या सगळ्या कटू आठवणी मागे टाकत तिने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
२१ वर्षीय अंकुश पंघालने रचला इतिहास
भारताच्या या सुवर्ण हॅटट्रिकवर २१ वर्षीय युवा बॉक्सर अंकुश पंघालने कळस चढवला. ८० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अंकुशने दक्षिण कोरियाच्या किम मिनसॉन्गला ४-० अशा 'स्प्लिट डिसिजन'ने धूळ चारली. याआधी उपांत्य फेरीत त्याने ७५ किलो गटातील विद्यमान जगज्जेता उझबेकिस्तानच्या फझलिद्दीन एर्किनबोएव याचा ४-१ असा पराभव करत मोठा उलटफेर केला होता. २०१८ सालच्या आशियाई स्पर्धेत अमित पंघालने मिळवलेल्या सुवर्णपदकानंतर, या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा अंकुश हा पहिलाच भारतीय पुरुष बॉक्सर ठरला आहे.

