बीड दि.२७ (प्रतिनिधी)-शहरातून जाणाऱ्या अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर टाकण्यात आलेले दुभाजक सातत्याने वादाचा विषय ठरले आहेत. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे दुभाजक खुले करण्याच्या मागणीला या विभागाने वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या असतानाच आता बीडच्या जिल्हा रुग्णालयासमोर देखील हा दुभाजक बंद करण्यात आला आहे.यामुळे जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा वळसा मारावा लागत आहे.विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयासमोर दुभाजक बंद करणाऱ्या महामार्ग विभागाने शिवराज चौकात मात्र अवघ्या १० मीटरच्या अंतरात दुभाजक दोन ठिकाणी उघडला आहे.त्यामुळे महामार्ग विभाग सामान्यांना छळण्यासाठीच आहे का? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.
बीड शहरातून जाणाऱ्या अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या संथ गतीने चालणाऱ्या कामामुळे अगोदरच नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असतानाच आता महामार्ग विभागाचे धोरण देखील सामान्यांच्या अडचणी वाढविणारे ठरले आहे.शहराच्या नगर रस्त्यावर असलेल्या न्यायालय,जिल्हाधिकारी कार्यालयमुख्य प्रशासकीय इमारत आदी ठिकाणी महामार्ग विभागाने नियमचिन्हे आणि अंतराचे कारण दाखवत दुभाजक खुले केले नाहीत,आता तोच प्रकार जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत केला जात आहे.बीडच्या जिल्हा रुग्णालयात मोठ्याप्रमाणावर रुग्ण येत असतात.त्यामुळे येथे पूर्वीपासून दुभाजक खुला करण्यात आलेला होता.विशेष म्हणजे पूर्वीचा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असताना देखील हा दुभाजक खुला होता.आता मात्र महामार्ग विभागाने जिल्हा रुग्णालयासमोरील दुभाजक बंद केला आहे.त्यामुळे जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी एकतर छत्रपती शिवाजी महाराज चौक किंवा शिवराज चौक येथून वळसा मारून यावे लागत आहे.विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा रुग्णालय हे अंतर देखील भरपूर आहे.त्यामुळे रुग्णाला घेऊन येणारी वाहने आता इतक्या अंतरावरून वळवावी लागणार आहेत.
विशेष म्हणजे याच महामार्गावर याच विभागाने जिल्हा रुग्णालयांपासून पुढे काही अंतरावर शिवराज चौकात दुभाजक खुला असतानाही १० मीटरच्या अंतरात अधिकारी निवासस्थानासमोर मात्र दुभाजक पुन्हा खुला ठेवला आहे.सामान्यांना नियम दाखवायचे मात्र अधिकारी निवासस्थानासमोर दुभाजक खुले करायचे हे नेमके कोणत्या नियमात बसते हा देखील प्रश्न आहेच.
लोकप्रतिनिधी,पालकमंत्र्यांनी बोलावे
बीड जिल्ह्यात सध्या सारे काही प्रशासकीय मनमर्जीनेच सुरु आहे.जिल्हा रुग्णालय हा कोणा एकाच विषय नाही,येथे जिल्हाभरातून रुग्ण येत असतात.त्यामुळे जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांनी देखील यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कान उपटाने आवश्यक आहे.
आताच बंदी कशासाठी ?
बीडचे जिल्हा रुग्णालय हे काही आज राष्ट्रीय महामार्गावर आलेले नाही.तर पूर्वी पासून म्हणजे कितीतरी दशकांपासून हे राष्ट्रीय महामार्गावर आहे.येथून पूर्वी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जात होता,त्यावेळी कोणी अंतराचे कारण दाखवून येथील दुभाजक बंद केला नव्हता,मग आताच नियम बदलले आहेत का यावर देखील महामार्ग विभाग मौन पाळून आहे.

