Advertisement

बीड-औरंगाबाद विभागात सोयाबिनचे बियाणे न उगवल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत मात्र कृषी विभागाचे अधिकारी या प्रकरणात कारवाई करायला फारसे उत्सूक नाहीत असे निरीक्षण नोंदवत या विभागात 22 हजार 831 तक्रारी आल्या आणि केवळ तेवीसच गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांची बियाणे कंपन्या आणि व्यापार्‍यांसोबत हातमिळवणी असल्याच्या शक्यतेलाच बळ मिळत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविली आहे. शेतकर्‍यांना फसविणार्‍या कोणालाही सोडणार नाही असे सांगतानाच पोलिसांनी कृषी विभागाची वाट न पाहता शेतकर्‍यांच्या तक्रारीवर बियाणे कंपनी आणि व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे निर्देशही उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दिले आहेत. सोयाबिन बियाणे न उगवल्या प्रकरणातील जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सुनावणी सुरु आहे. 


बीड जिल्ह्यासह औरंगाबाद विभागात सोयाबिनचे बियाणे न उगवल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या. या संदर्भातील बातम्यांनाच जनहित याचिका म्हणून स्विकारत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने याची दखल घेत कृषीसह महसुल आणि पोलीस विभागाला प्रतिवादी केले होते. नेमक्या किती तक्रारी आहेत आणि काय कारवाई झाली याची माहिती उच्च न्यायालयाचे न्या.टी.व्ही.नलावडे आणि न्या.श्रीकांत कुलकर्णी यांच्या पिठाने विचारली होती. 
मंगळवारी या प्रकरणातील सुनावणी दरम्यान कृषी विभागाने दिलेल्या माहितीवर न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली. 22 हजाराहून अधिक तक्रारी येतात आणि केवळ तेवीसच गुन्हे कसे दाखल होतात असा सवाल करतानाच बियाणे बाजारपेठेत जाण्यापूर्वी त्याचे मोठ्या प्रमाणावर नमुने काढून तपासणी केली जात असते मग बियाणे उगवले कसे नाहीत असा सवाल करत उच्च न्यायालयाने सॅम्पलींगच्या केलेल्या कारवाईचा अहवाल सुरक्षित ठेवला असून या प्रकरणातदेखील दोषी अधिकार्‍यांवर कारवाईच्या सूचना आपण देणार आहोत असे न्यायालयाने म्हटले आहे. कृषी विभागाचे अधिकारी बियाणे कंपन्या आणि व्यापार्‍यांशी हात मिळवणी करत आहेत ही शक्यता आपण वर्तवली होती आणि आता त्याला बळ मिळत आहे असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे. पोलीसांनी जे शेतकरी तक्रारी घेवून येतील त्या प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करावेत असे निर्देशही न्यायालयाने औरंगाबाद खंडपिठाच्या न्याय कक्षेतील सर्व पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. 

नांदूरघाट प्रकरणात गुन्हा दाखल करा
बीड जिल्ह्यातील नांदूरघाट येथे एका शेतकर्‍याने सोयाबिनचे बियाणे न उगवल्याने कृषीसेवा केंद्रासमोरच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात अद्याप कारवाई का झाली नाही? या प्रकरणातही तात्काळ गुन्हा दाखल करा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

सहसंचालकांना हजर होण्याचे आदेश
कृषी विभागाच्या वतीने सहसंचालक डॉ.डी.एल.जाधव यांनी दाखल केलेल्या शपथपत्रावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यांचे शपथपत्र केवळ शेतकर्‍यांना दोष देणारे असून बियाणे कंपन्या आणि व्यापार्‍यांची पाठराखण करणारे आहे असे म्हणत न्यायालयाने 13 जुलै रोजी सहसंचालक डॉ.जाधव यांनी स्वत: न्यायालयात हजर रहावे आणि ते हजर राहीले नाहीत तर त्यांच्या अटकेचे आदेश देवू असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Advertisement

Advertisement