Advertisement

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रतापसिंह पाटलांच्या नावाची चर्चा   

प्रजापत्र | Thursday, 24/09/2026
बातमी शेअर करा

बीड दि. २३ (प्रतिनिधी ) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मंगळवारी जाहीर झाल्यानंतर येथून तीन वेळा प्रतिनिधित्व करत असलेल्या सतीश चव्हाणांना ही निवडणूक सोपी वाटत असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी तितकेच तुल्यबळ 'नेटवर्क ' असलेल्या चेहऱ्याच्या नावावर चर्चा सुरु केली आहे. पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांना या निवडणुकीत उतरविण्याच्या हालचाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सुरु  झाल्या आहेत. असे झाल्यास निवडणुकीत चुरस वाढणार आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत मागच्या तीन वेळा राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण निवडून आलेले आहेत. मात्र यावेळी राष्ट्रवादी एकसंघ राहिलेली नाही. आ. सतीश चव्हाण यांच्याकडे शिक्षण संस्थांचे मोठे जाळे आणि स्वतःचे नेटवर्क असल्याने त्यांच्या विरोधात विरोधी पक्षांचा चेहरा कोण असेल यावर निवडणुकीचे समीकरण ठरणार आहे.
आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत थेट प्रतापसिंह पाटील यांना उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादी (शप ) चे धाराशिव जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रतापसिंह पाटील यांचेही शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम आहे. त्यांच्याकडे शिक्षण संस्थांचे जाळे आहेच, त्यासोबतच परभणी आणि बीड जिल्ह्यात असलेले त्यांच्या नाते संबंधांचे जाळे आ. सतीश चव्हाण यांना आव्हान देऊ शकते. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यात देखील त्यांची मोठी पकड आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (शप ) कडून प्रतापसिंह पाटील यांची उमेदवारी आल्यास आ. सतीश चव्हाण यांच्यासाठी ते आव्हान तगडे ठरेल.

Advertisement

Advertisement