Advertisement

विजेचा धक्का लागून दोन बांधकाम मजुरांचा मृत्यू

प्रजापत्र | Saturday, 12/09/2026
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि. 12(प्रतिनिधी): येथील पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या बांधकामाच्या स्लॅब भरणीचे काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का लागून दोन बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेने शहरात खळबळ उडाली  आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समितीसमोर एका बांधकामाच्या स्लॅब भरणीचे काम सुरू होते.यावेळी मंगळवार पेठ, चांभार गल्ली येथील बबन वाघमारे (वय ५०) आणि यशवंत वाघमारे (वय ३३) हे दोघे बांधकाम मजूर काम करत होते. स्लॅब भराईचे काम सुरू असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने दोघेही गंभीररीत्या भाजले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, विजेच्या जोरदार धक्‌यामुळे दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांचा अभाव होता का? विजेच्या तारांचा बांधकामाच्या साहित्याशी किंवा लोखंडी सळ्यांशी संपर्क कसा आला? याबाबत प्रश्न उपस्थित होत असून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे. या दुर्घटनेत दोन कष्टकरी कामगारांचा जीव गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बबन वाघमारे व यशवंत वाघमारे यांच्या अकाली निधनामुळे मंगळवार पेठ, चांभार गल्लीसह संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement