Advertisement

ग्रामविकासाचा १ कोटींचा निधी हडपला

प्रजापत्र | Wednesday, 26/08/2026
बातमी शेअर करा

  केज दि.२६(प्रतिनिधी): तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत, नांदूरघाट येथे १ कोटी ३ लाख ८९ हजार ८० रुपयांचा प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. बीड जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर एवढ्या मोठ्या रकमेच्या वसुलीचे आदेश दिले आहेत. तीन दिवसांत ही रक्कम न भरल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा २४ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.

  चौकशी समितीने या गैरव्यवहारासाठी पाच व्यक्तींना जबाबदार धरले आहे. यात सरपंच सुनीता युवराज जाधव यांच्याकडून ३३ लाख १५ हजार १४७ रुपये, ग्रामसेवक बी. एन. शिरसाट यांच्याकडून २५ लाख ३६ हजार ४३४ रुपये, रोजगार सेवक सादिक दिलावर शेख यांच्याकडून ३३ लाख १५ हजार १४७ रुपये, शाखा अभियंता व्ही. एस. सासवडे यांच्याकडून ४ लाख १५ हजार १५३ रुपये आणि नरेगाचे तांत्रिक अधिकारी आर. आर. दराडे यांच्याकडून ८ लाख ७ हजार ५९९ रुपये वसूल केले जाणार आहेत.रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे न करताच हा निधी लाटल्याचे समोर आले आहे. सध्या केवळ रस्त्यांच्या कामांमधील घोटाळा उघड झाला असून, आगामी काळात घरकुल, विहीर व इतर कामांमधील गैरव्यवहारही समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, वसूल होणारा निधी शासन दरबारी जमा न करता, विशेष समिती गठित करून तो नांदूरघाट गावाच्याच विकासासाठी खर्च करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सोनाली अमोल जाधव यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.
 

Advertisement

Advertisement