Advertisement

पैशाच्या वादातून तरुणाचा खून

प्रजापत्र | Tuesday, 18/08/2026
बातमी शेअर करा

धारूर दि.१८(प्रतिनिधी): गाय गोठा मंजूर करून देण्यासाठी घेतलेले २० हजार रुपये परत मागितल्याच्या वादातून भावाच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची संतापजनक घटना पिंपळवाडा ग्रामपंचायत अंतर्गत मांजरकडा तांडा येथे शुक्रवारी (दि.१४) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. राजाभाऊ भगवान तिडके असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी सविता तिडके यांच्या फिर्यादीवरून सचिन अशोक जाधव आणि अशोक यमाजी जाधव यांच्याविरुद्ध धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, गाय गोठा योजना मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपये देण्यात आले होते. मात्र, योजना मंजूर न झाल्याने संबंधितांकडे पैसे परत मागण्यात आले. याच पैशांच्या व्यवहारावरून सचिन जाधव व अशोक जाधव यांच्यासोबत वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शुक्रवारी रात्री हा वाद सुरू असताना राजाभाऊ तिडके यांचा भाऊ बाबासाहेब भगवान तिडके यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी राजाभाऊ घटनास्थळी गेले. यावेळी सचिन जाधव व अशोक जाधव यांनी राजाभाऊ यांच्याशी वाद घातल्याचे सांगण्यात आले.
वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड मारण्यात आला. या हल्ल्यात राजाभाऊ गंभीर जखमी झाले.
जखमी राजाभाऊ यांना तातडीने धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र घुगे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास धारूर पोलिस करीत आहेत.

Advertisement

Advertisement