Advertisement

 परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार

प्रजापत्र | Thursday, 13/08/2026
बातमी शेअर करा

मुंबई :राज्यात एकीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धो-धो पाऊस आहे. त्याचवेळी विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल आणि चिंतातूर झाला आहे. याच 'अस्मानी' संकटाच्या सावटात असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सप्टेंबरनंतरचा परतीचा पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यात चांगलाच बरसणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी माध्यमांशी  बोलताना व्यक्त केला आहे. 

   परतीच्या पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील धरणांमधला पाणीसाठा वाढणार असल्याची माहितीही पंजाबराव डख यांनी दिली. परतीच्या पावसाचा फायदा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांना होणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, आज रात्रीपासून १५ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत विदर्भात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. हा पाऊस सोयाबीनच्या पिकाला जीवनदान देणारा असल्याचं ते म्हणालेत. यासोबतच देशभरातील 'एल-निनो'चा धोका टाळण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि इतर उपायांवर लक्ष केंद्रित करण्याच्या आवश्यकतेवर पंजाबराव डख यांनी भर दिला. 

 

पंजाबराव डख काय काय म्हणाले? 

परतीच्या पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात कमी पावसाचा बॅकलॉग भरून निघणार. 
सप्टेंबरनंतरचा परतीचा पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यात चांगलाच बरसणार.
या परतीच्या पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील धरणांमधला पाणीसाठा वाढणार.
परतीच्या पावसाचा फायदा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांना होणार.
आज रात्रीपासून 15 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत विदर्भात चांगला पाऊस होणार.
सदर पाऊस सोयाबीनच्या पिकाला जीवनदान देणारा आहे.
देशभरातील 'अलनिनो'चा धोका टाळण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि इतर उपायांवर लक्ष केंद्रित करावे. 

 

पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण
पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी राहण्याचा अंदाज आहे. यवतमाळसह काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसामुळे स्थानिक पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि झाडे पडण्याचा धोका हवामान विभागाने नमूद केला आहे. मुंबई आणि परिसरातही पावसाची शक्यता कायम असून नागरिकांनी प्रवास करताना आणि सखल भागात जाताना काळजी घ्यावी. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून जिल्हानिहाय इशारे आणि अपडेट्स जारी केले जात आहेत.

Advertisement

Advertisement