बीड दि.६(प्रतिनिधी):पाटोदा तालुक्यात दिवसाढवळ्या सोनाराला अडवून सोन्या-चांदीचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२ ऑगस्ट रोजी हिवरसिंगा येथील रमेश उदावंत (वय ४७) हे निर्गुडीच्या आठवडी बाजारासाठी सोन्या-चांदीचे दागिने घेऊन मोटारसायकलवरून जात होते. सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास निर्गुडी-हिवरसिंगा मार्गावर पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांची मोटारसायकल अडवली. जबरदस्तीने त्यांच्या ताब्यातील सोन्या-चांदीचे दागिने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.या घटनेप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती व खबऱ्यांच्या मदतीने तपास करत रोहन ऊर्फ बॉबी संजय गुणवंत (वय २४), रा. शास्त्रीनगर, नाळवंडी नाका, बीड याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार (MH-12 JM-4300) तसेच चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.सदरील कारवाई नवनीत कॉवत, पोलीस अधीक्षक, बीड, समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, विश्वजित खुळे उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी,पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, पोह अशोक दुबाले,सोमनाथ गायकवाड, बाळासाहेब सानप,मारुती कांबळे, आसेफ शेख,अश्विनकुमार सुरवसे व चापोअ सिद्धेश्वर मांजरे यांनी केली आहे.

