Advertisement

नीट पेपरफुटीनंतर आता गुणांचा ‘घोटाळा'

प्रजापत्र | Saturday, 18/07/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.१८(प्रतिनिधी): वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली राष्ट्रीय पातळीवरील ‘नीट यूजी २०२६’ परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची मालिका अजूनही संपताना दिसत नाही. ३ मे रोजी झालेली परीक्षा पेपर फुटीच्या आरोपांमुळे रद्द झाल्यानंतर, २१ जून रोजी देशभरात पुन्हा परीक्षा घेण्यात आली. गुरुवार (दि.१६) जुलै रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. पण, आता निकालात प्रचंड गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. 

   अधिकृत ‘अन्सर की’नुसार (उत्तरपत्रिका) ५२२ गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष स्कोअर कार्डवर मात्र अवघे ९५ गुण मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व तणावाचे वातावरण आहे. बीडमध्ये हा प्रकार समोर आला आहे. राज्य आणि देश पातळीवर हा आकडा आणखी मोठा असण्याची भीती वर्तवली जात आहे. ‘अन्सर की’प्रमाणे मोजलेल्या गुणांपेक्षा कित्येक पटीने कमी गुण स्कोअर कार्डवर दिसत असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) या गलथान कारभारामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. आधीच पेपरफुटीमुळे बदनाम झालेली एनटीए आता या तांत्रिक त्रुटीवर किंवा गुणांच्या घोटाळ्यावर काय स्पष्टीकरण देते आणि कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.  बीडमधील सोहम नितीन गवते या विद्यार्थ्याने कोणताही क्लास न लावता दिवस-रात्र एक करून अभ्यास केला होता. वेबसाइटवरील ‘अन्सर की’नुसार त्याला ५२२ गुण मिळणे अपेक्षित होते आणि तसा पुरावा त्याच्याकडे आहे. मात्र, एनटीएमार्फत ई-मेलवर आलेल्या स्कोअर कार्डवर त्याला अवघे ९५ गुण दाखवण्यात आले आहेत. या निकालाने खचलेल्या सोहमने समुपदेशकांकडे धाव घेतली असून, त्याचे पालक नितीन गवते यांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.

Advertisement

Advertisement