अंबाजोगाई दि.१७(प्रतिनिधी): येथे गजानन महाराज पालखी सोहळ्यादरम्यान गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार (दि.१६)रोजी रात्री ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन चोरीचे गुन्हे देखील उघडकीस आले आहेत.
अंबाजोगाई येथे गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असताना शुक्रवार (दि.१०) रोजी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याचे मिनी गंठण चोरीला गेले होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करून आरोपींचा शोध घेतला.तपासादरम्यान विशाल संजय हातागळे (वय २८), रा. गांधीनगर, नाळवंडी रोड, बीड व दत्ता विजय गायकवाड (वय २६) रा. गांधीनगर, नाळवंडी रोड, बीड यांनी गर्दीचा फायदा घेऊन ४८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरल्याचे निष्पन्न झाले. तसेच अशोक बबन जाधव (वय २९) रा. शास्त्रीनगर, नाळवंडी रोड, बीड याने ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण चोरल्याचे उघड झाले. तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले.या कारवाईत एकूण ५९ ग्रॅम वजनाचे जवळपास ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहायक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोनि.शरद जोगदंड,पोउनि.सुशांत सुतळे, पोह.मारोती कांबळे, रामचंद्र केकान, सचिन सानप, सोमनाथ गायकवाड, गोविंद भताने, विकास राठोड, पो.अं.सचिन आंधळे, चालक अतुल हराळे,तसेच पांडुरंग काळे यांनी केली.

बातमी शेअर करा
