Advertisement

'लाडकी बहीण' योजनेतून तब्बल ९२ लाख महिलांची नावे वगळली

प्रजापत्र | Monday, 13/07/2026
बातमी शेअर करा

मुंबई :राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून एक अत्यंत मोठी माहिती समोर येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, या योजनेतून आतापर्यंत तब्बल ९२ लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. केवळ एक महिन्यापूर्वी सरकारने ८० लाख लाभार्थी कमी झाल्याचे सांगितले होते, मात्र आता हा आकडा थेट ९२ लाखांवर पोहोचला आहे. मूळ २.४ कोटी लाभार्थ्यांच्या तुलनेत ही घट तब्बल ३८ टक्के एवढी मोठी आहे. 

  केवळ तांत्रिक अडचणींमुळे नव्हे, तर ई-केवायसी न करणे, उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे आणि वयाचे निकष न बसणे यांसारख्या विविध कारणांमुळे ही मोठी कपात करण्यात आली आहे. याशिवाय सुमारे १४ हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे. 

 

 कोणत्या कारणांमुळे किती नावे वगळली? 
ताज्या आकडेवारीनुसार, निकषांमध्ये न बसणाऱ्या आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्यात आले आहे.

१) ई-केवायसी अपूर्ण: सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे आठ महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र, मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करू शकल्याने ५० ते ५५ लाख महिला यादीतून बाद झाल्या.

२) वार्षिक उत्पन्न मर्यादा: योजनेच्या नियमापेक्षा जास्त वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या १२ लाख महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले. तपासणीत १२ लाख महिला या प्राप्तीकर भरणाऱ्या असल्याचे आढळून आले, ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

३) वयोमर्यादा ओलांडली: ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ४.५ लाखांहून अधिक महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
 

Advertisement

Advertisement