गेवराई दि.१३(प्रतिनिधी): शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने आणि मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका तरुणाला तब्बल ७ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध बीड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील मालेगाव खुर्द येथील रहिवासी असलेले दत्तात्रय सुर्यभान खराद (वय ४०) हे पुणे येथे एका आयटी कंपनीत खाजगी नोकरी करतात. ५ जून २०२६ रोजी ते घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून मेसेज आणि कॉल आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव सुनील सांगून ट्रेडिंग डव्हायझरी सेवा देत असल्याचे भासवले. त्यानंतर त्याने विवेक नावाच्या ब्रोकरमार्फत त्यांचे ट्रेडिंग खाते उघडण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने आधारकार्ड, पॅनकार्ड पाठवून सुरुवातीला ३० हजार रुपये गुंतवले. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराचा विश्वास संपादन करून त्यांना 'मार्केट प्लीज इन्व्हेस्टमेंट लिमिटेड' आणि 'भवानी स्टॉक ब्रोकर' नावाच्या खात्यांवर ट्रेडिंग करण्यास भाग पाडले. काही दिवसांनी शेअर्स होल्डिंग आणि झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांवर ६ लाख ८० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर नफ्यातील हिस्सा भरण्याच्या बहाण्याने आणखी ४० हजार रुपये उकळले. आरोपींनी सतत पैशांची मागणी लावून धरल्याने तक्रारदाराला संशय आला. त्यांनी सेबीचे नोंदणी प्रमाणपत्र मागितले असता आरोपींनी बनावट प्रमाणपत्र पाठवले, जे तपासात बनावट असल्याचे निष्पन्न झाले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दत्तात्रय खराद यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश एकनाथराव केळे करत आहेत.

