अंबाजोगाई दि.१३ (प्रतिनिधी): येथील तथागत चौकात सोमवारी सकाळी एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विवेक करपे असे मृत इसमाचे नाव असून, ते शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने हा घातपात की अपघात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अंबाजोगाई शहरातील तथागत चौकात सोमवारी सकाळी एका इसमाचा मृतदेह पडून असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी याची माहिती अंबाजोगाई पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला.मृत विवेक करपे (वय ४१) हे मूळचे केज तालुक्यातील जवळबन गावचे रहिवासी होते. सध्या ते आपल्या पत्नी व मुलाबाळांसह केज येथे वास्तव्यास होते. ते वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील एका खासगी शाळेत कार्यरत होते.घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना मयताच्या खिशात प्रवासाचे तिकीट सापडले आहे. यावरून करपे हे केजवरून किंवा अन्य ठिकाणाहून प्रवास करून अंबाजोगाईत आले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.अंबाजोगाई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

बातमी शेअर करा
