Advertisement

परळी औष्णिक विद्युत केंद्राची ऐतिहासिक कामगिरी; संच क्रमांक ८ कडून सलग १०० दिवस अखंड वीजनिर्मिती

प्रजापत्र | Friday, 30/10/2026
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या (महानिर्मिती) परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राने एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. केंद्रातील संच क्रमांक ८ (युनिट ८) ने सलग १०० दिवस अखंडपणे वीजनिर्मिती करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या औष्णिक विद्युत केंद्राच्या स्थापनेपासून आतापर्यंत पहिल्यांदाच एखाद्या संचाने सलग इतके दिवस विनाअडथळा वीजनिर्मिती करण्याची कामगिरी नोंदवली आहे.

२९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी या संचाने सलग १०० दिवसांचे अखंड संचलन पूर्ण केले. वीजनिर्मिती क्षेत्रात तांत्रिकदृष्ट्या हे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. मात्र, या संचाने हे आव्हान यशस्वीपणे पेलल्यामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या ऐतिहासिक यशानंतर केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. "वीजनिर्मिती क्षेत्रातील ही उल्लेखनीय कामगिरी केंद्रातील अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार आणि कंत्राटी कामगार यांच्या सामूहिक प्रयत्नांचेच फलित आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. दिवस-रात्र मेहनत घेऊन संचाचे सुरळीत आणि अखंड संचलन सुनिश्चित करणाऱ्या अभियंत्यांचे व कामगारांचे मुख्य अभियंत्यांनी विशेष कौतुक केले.

यंत्रणेचे उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, सर्व विभागांमधील परस्पर सहकार्य, कामाप्रती असलेली सर्वांची निष्ठा आणि संचाची करण्यात आलेली सातत्यपूर्ण देखभाल यांमुळेच हे मोठे यश साध्य होऊ शकले, असे मत मुख्य अभियंता इंगळे यांनी व्यक्त केले. या यशामुळे महानिर्मितीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परळी केंद्राच्या तांत्रिक कार्यक्षमतेवरही शिक्कामोर्तब झाले आहे.

Advertisement

Advertisement