Advertisement

टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक 

प्रजापत्र | Saturday, 27/06/2026
बातमी शेअर करा

 मुंबई: उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर राज्यात चांगलीच खळबळ उडाली असून उद्या होणारी परीक्षाही स्थगित करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पेपर फुटीचं भिवंडी कनेक्शन समोर आलं असून पेपर लीक करणाऱ्या टोळीविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. भिवंडी येथे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पेपर फुटल्याचे उघडकीस आले आहे. अटक झालेल्या तिघांची नावं अद्याप समोर आलेली नाही. मात्र, पेपर लीक करणारे हात नेमके कुणाचे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

       मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्तींकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित गोपनीय माहिती असल्याचा संशय होता. त्यानंतर कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून धाड टाकण्यात आली. या कारवाईत संशयितांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.प्राथमिक तपासात संशयितांकडे आढळलेले काही प्रश्न आणि प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जुळत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर प्रश्नपत्रिकेची गोपनीयता भंग झाल्याचा संशय बळावला आणि कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.या घटनेनंतर परीक्षा परिषदेने तातडीने परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यभरातील डी.टी.एड. आणि बी.एड. पात्रता असलेल्या लाखो उमेदवारांची निराशा झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी लेखी निवेदनाद्वारे सांगितले की, शिक्षक पात्रता परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात घेणे हे परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement