Advertisement

'गेले ते कावळे , राहिले ते मावळे', 'कोणी कुठेही गेले तरी आम्हाला फरक पडत नाही ', 'आता कोणाला जायचेच असेल तर त्याला कसे थांबविणार? ' या आणि असल्याचं धाटणीच्या 'ठाकरी ' वक्तव्यांमधून मागच्या ६० वर्षात शिवसेनेत ६ वेळा मोठी म्हणावी अशी बंडाळी झाली, अगदी ४ वर्षांपूर्वी तर शिवसेनेचे 'घरटे'च हिरावले गेले आणि उद्धव ठाकरेंच्या गटालाच वेगळे नाव घ्यावे लागले. त्यानंतर चार वर्षांनी पुन्हा पक्षापासून ६ खासदार दुरावत आहेत . पक्षाच्या स्थापनेला उद्या ६० वर्ष पूर्ण होत असताना, म्हणजे शिवसेनेचा हिरक  महोत्सव होत असताना,पक्षाच्या फुटीबद्दल कधी भाजपवर, कधी शिंदेंवर, कधी सत्तेच्या गैरवापराचे, कधी संपत्तीच्या अमिषाचे आरोप करूनच (त्यात तथ्य असले तरी ) भागणार आहे का ? आपण पैलू पाडलेले हिरे आपल्यापासून का दुरावत आहेत याबाबत उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि 'मातोश्री ' आत्मपरीक्षण करणार आहे का नाही ?

बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली त्याला उद्या (१९ जून ) ६० वर्ष पूर्ण होतील. म्हणजे शिवसेना साठीची होईल. कोणत्याही पक्ष, संघटनेसाठी सहा दशकांचा कालावधी म्हणजे तसा खूप मोठा म्हणावा असाच. त्यातही प्रादेशिक मर्यादा असलेल्या पक्षांसाठी,भाजपसारखे विस्तारवादी पक्ष सत्तेत असतानाच्या आणि सत्तेचा कसाही वापर करत असतानाच्या काळात हा काळ तसा मोठा आणि आव्हानांचा देखील असतो. शिवसेना साठी पूर्ण करत असतानाच, वर्धापनाच्या दोन दिवस अगोदर शिवसेना (उबाठा ) मधून आणखी सहा खासदार दुरावावेत हे पक्षासाठी चिंताजनकच. आता यासाठी पुन्हा भाजपला दोष दिला जाईल, सत्तेचा गैरवापर केला असे म्हटले जाईल, ते खरे नाही असेही नाही, मागच्या काही काळात भाजपचा विस्तारवाद अनेक प्रादेशिक पक्षांचा बळी घेत आहेच, लोकसभेत दोन तृतीयांशचा आकडा गाठण्यासाठी देशभर फोडाफोडीचे विकृत राजकारन सुरु आहेच, त्यामुळे या साऱ्या प्रकरणात प्रत्यक्ष  नसला तरी अप्रत्यक्ष का होईना, भाजपवर दोष ठेवायला जागा आहेच, मात्र केवळ भाजपला किंवा एकनाथ शिंदेंना दोष देऊन उद्धव ठाकरे आणि मातोश्रीला यातून बाजूला होता येणार आहे का ?
शिवसेनेची स्थापना मुंबईत मुंबईकरांसाठी, मराठी माणसासाठी म्हणून झालेली असली तरी अगदी स्थापनेपासूनच शिवसेनेला स्वतःचा एकाच एक असा काही राजकीय अजेंडा नव्हता. आज कडव्या हिंदुत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेने सुरुवातीला अगदी मुस्लिम लिग सोबत निवडणूक लढविली होती, हे जुन्या पिढीला नक्कीच आठवत असेल, काँग्रेसच्या घराणेशाहीवर शिवसेना बोलायची, पण त्या काँग्रेस सोबत देखील शिवसेना बाळासाहेबांच्या हयातीतच गेली होतीच. याचा उल्लेख यासाठी की शिवसेनेला राजकारणात कोणती विचारधारा कधी वर्ज्य वाटली नाही. शिवसेनेने ग्रामीण भागात भलेही तळागाळातील, उपेक्षित, विस्थापित व्यक्तींना राजकारणात संधी दिली असेल, पण पक्षाचा 'रिमोट कंट्रोल ' कधी तसा विस्थापित नव्हता. म्हणूनच १९९१ ला शिवसेनेत पहिले बंड झाले आणि त्याने महाराष्ट्र हादरला , ते छगन भुजबळांचे. मनोहर जोशींना विरोधीपक्ष नेते केल्याने भुजबळांनी शिवसेना सोडली आणि त्यांच्या बंडाला 'संवैधानिक ' ठविण्यासाठी त्यावेळी शरद पवारांनी सारी सांसदीय  आयुधे (जी आज भाजप वापरत आहे ) ती वापरली. त्यानंतर शिवसेनेची राज्यात सत्ता असताना गणेश नाईक, गुलाबराव गावंडे ,सुरेश नवले या मंत्र्यांनी राजीनामे देऊन शिवसेना सोडली , त्याहीवेळी या मंत्र्यांचा आरोप 'शिवसेनेत बहुजनांवर अन्याय होतोय' असाच होता. या दोन्ही वेळी या आरोपांवर भाष्य करण्याची आवश्यकता बाळासाहेब ठाकरेंना वाटली नव्हती , उलट 'गेले ते कावळे, राहिले ते मावळे ' ही ठाकरेंची भूमिका होती. मात्र त्यावेळी शिवसेनेची खरी शक्ती असलेल्या कडवट शिवसैनिकांची साथ बाळासाहेबांसोबत होती. पुढे उद्धव ठाकरे शिवसेनेत सक्रिय झाले आणि २००५ मध्ये अगओड्र नारायण राणे, नंतर खुद्द राज ठाकरे यांना पक्ष सोडावा लागला. त्याहीवेळी पक्ष सोडणारांनी 'विठ्ठल नव्हे तर बडव्यांच्या त्रासाचा' आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीचा उल्लेख केला होता, त्याहीवेळी ठाकरे कुटुंबाने या आरोपांचे आत्मचिंतन करण्याऐवजी 'गेले ते कावळे ' किंवा 'ज्यांना जायचे ते जा ' अशीच भूमिका घेतली. तोपर्यंत तर भाजपचा विस्तारवाद सुरु झालेला नव्हताच, तरीही आपल्या संघटनात्मक बाबींमध्ये काही चूक आहे का यावर 'मातोश्री ' कधी अंतर्मुख झाली नाही.
शिवसेनेमधील सर्वात मोठे बंड झाले ते एकनाथ शिंदेंचे , २०२२ मध्ये. त्यावेळी आतापर्यंत शिवसेना जाणारांना 'कावळे ' म्हणायची, मात्र एकनाथ शिंदे त्याच शिवसेनेचे 'घरटे 'च आपल्यासोबत घेऊन गेले आणि 'मातोश्री'लाच नवीन गटाचे नाव लावावे लागले. एकनाथ शिंदेंच्या बंडामागे स्वतः शिंदेंची सत्तालालसा , भाजपचा प्रादेशिक पंक्ष पंगू करण्याचा अजेंडा होताच, याबाबत कोणाचेच दुमत असणार नाही, मात्र उद्धव ठाकरेंचा त्यांच्याच आमदार, खासदारांशी कमी झालेला संपर्क, अगदी जिल्हाप्रमुख, आमदार, खासदार यांना देखील मातोश्रीवर भेटीसाठी ताटकळत राहावे लागणे आणि कमी झालेली 'आत्मीयता ' ही कारणे  देखील तितकीच महत्वाची होती, मात्र जाणारांवर 'गद्दार ', 'खोके बोके ' असे आरोप करण्यापलीकडे इतर कारणांवर पक्षाने आतनचिंतन केले नाही. आता देखील सहा खासदार दुरावत असताना त्यांचा आरोप 'संघटनेत वरिष्ठांच्या भेटी होत नाहीत, आमच्या सुख दुःखात पक्ष नेतृत्व  लक्ष्य देत नाही, आम्हाला पाठबळ मिळत नाही ' हाच आहे. म्हणजे नारायण राणे, राज ठाकरेंनी २१ वर्षपूर्वी केलेला बडवे आणि 'चार कारकून ' हा आरोप असेल किंवा चार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी केलेला 'भेटी दुर्मिळ ' होण्याचा आरोप असेल याचे खंडन किंवा आमच्याकडे असे काही नाही असे ठामपणे सांगण्याची आवश्यकता कधी उद्धव ठाकरेंना वाटली नाही. 'ज्यांना जायचे त्यांनी जावे ' असे किंवा 'मी हे सारे तुमच्यासाठी करीत आहे, जायचे असेल तर तसे सांगा , मी राजकारण थांबवतो ' असले भावनिक उद्गार करून संघटन चालणार कसे ? हे सारे भाजप घडवून आणत आहे, याला भाजपचे, सत्तेचे पाठबळ आहे, कोणत्याच पक्षांतराला नैतिक आधार काहीच नाही हे सारे खरे आहे, मात्र हे सारे घडण्यासाठी मैदान उपलब्ध करून देण्याला ठाकरेंची आणि 'मातोश्री' ची धोरणे आणि भूमिका तर किमान काही अंशी तरी कारणीभूत नाही ना ? याचे आत्मचिंतन हा पक्ष करणार आहे का ?

 

Advertisement

Advertisement