सांगली : वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी शासनाने ५ एकर जागा उपलब्ध केली आहे. या जागेच्या उताऱ्यावर सहायक आयुक्त, समाजकल्याण, सांगली यांच्या नावाची नोंद झाली आहे. यानिमित्ताने अण्णा भाऊंच्या स्मारकाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहे.
शासनातर्फे वाटेगावमध्ये सुमारे ३९ कोटी रुपये खर्चून भव्य अण्णा भाऊ साठे स्मृतिस्थळ उभारण्यात येणार आहे. या निधीला शासनाने मंजुरी दिली असली, तरी गावात पुरेशा जागेची उपलब्धता होत नव्हती. अखेर गावतलावाजवळ म्हणजे बापू तलाव परिसरात पाच एकर जागा उपलब्ध झाली आहे. या जागेवर शासनाचे नाव लावण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ती नुकतीच पूर्ण झाली. या जागेवर समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांच्या नावाची नोंद झाली आहे. त्यामुळे स्मारकाच्या उभारणीच्या कामातील एक मोठा अडसर दूर झाला आहे.'तू गुलाम नाहीस, वास्तव जगाचा निर्माता आहेस', असे ठणकावून सांगणाऱ्या लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊंचे यांचे स्मारक त्यांच्या जन्मगावी वाटेगाव येथे आहे. पण, ती छोटेखानी स्वरूपाची शिल्पसृष्टी आहे. अण्णा भाऊंच्या जयंतीदिनी अभिवादनासाठी हजारो अनुयायी तेथे गर्दी करतात.साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे क्रांती फोर्सचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आकाश तिवडे यांच्यासह फकिरा पॅंंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, गणेश पाटील, येळावी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सयाजी माने आदींनी सांगलीत समाजकल्याण विभागात जागेच्या नोंदीची माहिती घेतली.
असे असेल स्मारक
अण्णा भाऊंच्या जीवनाचे आणि साहित्याचे समग्र चित्रण दाखवणाऱ्या स्मारकाची मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल घेऊन शासनाने ३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या स्मारकात अण्णा भाऊंचा भव्य पुतळा, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि सभागृह उभारले जाणार आहे.

