बीड-चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्रम्हगांवमध्ये हनुमानाच्या मूर्तीला गुरुवारी रात्री (दि.२८) मे रोजी मटणाचा तुकडा चिकटविल्याने खळबळ उडाली होती.घटनेचे गांभीर्य बघता शुक्रवार (दि.२९) मे रोजी अप्पर पोलीस अधिक्षक,पोलीस उपाधीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा आणि चकलांबा ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांना शांतात पाळण्याचे आवाहन केले होते.अखेर या प्रकरणातील आरोपीला चकलांबा पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून गुरुवारी रात्री ब्रम्हगांवमधूनच अटक केली आहे.
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्रम्हगांवमध्ये हनुमानाची जुनी मूर्ती आहे.गावातील जागृत देवस्थान म्हणून भाविकांची याठिकाणी श्रद्धा आहे.गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केली.हा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.गावकर्यांनी चकलांबा पोलिसांना माहिती दिल्यानंतर यात घटनास्थळी भेट देऊन मांसाचा तुकडा जप्त करण्यात आला.मात्र घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक समीर शेख,पोलीस उपाधीक्षक अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शिवाजी बंटेवाड,चकलांबा ठाण्याचे प्रभारी सचिन इंगळे यांनी भेट दिली होती.त्यानंतर दुसऱ्या दिवशी हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक करून महाआरती करण्यात आली.अखेर याप्रकरणातील आरोपी असलेल्या एका माथेफिरुला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
आरोपी ताब्यात,चौकशी सुरु
ब्रम्हगांवमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने कसून चौकशी करत गावातूनच एकाला ताब्यात घेतले आहे.तो ट्रकवर ड्राइव्हर होता.सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे.दोन साक्षीदार देखील मिळाले असून आरोपीबाबत तपास सुरु असल्याने त्याची माहिती आताच देणे योग्य नाही.तपास झाल्यानंतर सविस्तरपणे कळविण्यात येईल अशी प्रतिक्रिया स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांनी दिली.
हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन?
ब्रम्हगांवमध्ये घडलेल्या घटनेनंतर आ.संग्राम जगताप,आ.महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याच्या चर्चा असून १६ मे रोजी सभा पार पडणार असल्याचे कळते.याबाबत अद्याप तरी केवळ चर्चा सुरु आहेत पोलिसांकडे सभेला ना परवानगी मागितली गेली आहे ना त्यांनी परवानगी दिली आहे.

