नागपूर : विदर्भामध्ये सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे आगामी 'नीट' साठीदेखील विद्यार्थ्यांना कूलर, पिण्याचे शुद्ध पाणी, प्राथमिक वैद्यकीय उपचार, अखंड वीजपुरवठा आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकार, राज्य सरकार व नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांना दिला. आगामी 'नीट' २१ जून रोजी होणार आहे. गेल्या 'नीट'साठीही समान आदेश देण्यात आला होता.
न्यायालयाने प्रवेश परीक्षा केंद्रांवरील असुविधांची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात आवश्यक आदेश देण्यासाठी स्वतःच जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. परीक्षा केंद्रांवर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. विदर्भातील २५ ते ३० हजार विद्यार्थी 'नीट' परीक्षा देणार आहेत. सध्याच्या उष्ण वातावरणात कूलर नसल्यास तीन तासांचा पेपर सोडवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर हवा खेळती राहणे, गारवा असणे, पिण्याचे थंड पाणी आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळणे आवश्यक आहे. हा केवळ प्रशासकीय व्यवस्थेचा मुद्दा नसून त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंध आहे.
यानंतर कायमस्वरूपी आदेश
न्यायालयाने या प्रकरणावर चार आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली आहे. त्यावेळी सर्व व्यावसायिक स्पर्धा परीक्षांच्या केंद्रांवर संबंधित सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आवश्यक आदेश देण्यात येईल, असेसुद्धा न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.

