बीड दि.१(प्रतिनिधी): देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणात सीबीआयने कारवाईचा धडाका लावत महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर, बीडमधून अनेकांना अटक केली आहे. याप्रकरणी, सीबीआयकडून आरोपींची कसून चौकशी सुरू असून काही आरोपींना आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहेत. मात्र, याप्रकरणात पेपरफुटीचा मास्टरमाईंड असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी याच्यावर प्रशासनाने तोडक-मोडक कारवाई सुरू केल्याचं दिसून येत आहे. बीड (Beed) शहरातील शाहू नगर भागात सुरू असलेल्या बांधकामावर अखेर हातोडा मारण्यात आला आहे.
नगरपालिका प्रशासनाने सदरील बांधकाम संबंधित ठेकेदाराने स्वतः पाडून घ्यावे याकरिता नोटीस बजावली होती. मात्र, प्रसासनाच्या या नोटीसीचा आज अल्टिमेटम संपला आहे, त्यामुळे या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला जात आहे. विशेष म्हणजे स्वतः संबंधित ठेकेदाराकडून अनधिकृत असलेले बांधकाम पाडले जात आहे. देशभरात गाजत असलेल्या आणि देशभरातून संताप व्यक्त होत असलेल्या, 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ करणाऱ्या नीट पेपर फुटीच्या घोटाळ्यात सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीचे नाव आले होते, त्यानंतर सीबीआयने त्यांना अटकही केली. याप्रकरणी, कारवाईला वेग आला असून पी.व्ही. कुलकर्णी हे मूळ बीडमधील असल्याने त्यांचे शहरातील शाहू नगर भागात चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर, या बांधकामातील अवैधते बाबात पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावल्यानंतर हे पाडकाम केले जात आहे.

