बीड दि.३१ (प्रतिनिधी): मांजरसुंबा परिसरात रविवारी पहाटे कार-ट्रकचा भीषण अपघात होऊन इंदापूर येथील एकाचा जागीच मृत्यु झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देऊन रात्री परतीच्या प्रवासात असताना हा अपघात घडला.
मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी अंतरवली येथे शनिवार (दि.३०) रोजी तळत्या उन्हात उपोषणास बसले होते त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातून मराठा बांधव उपोषणस्थळी दाखल झाले होते.रविवार (दि.३१) रोजी पहाटे सुमारे २:२० च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ धुळे–सोलापूर मार्गावरील कन्हैया हॉटेलजवळ हा अपघात झाला. कार क्रमांक एमएच ४२ बीइ २८२७ ही भरधाव वेगात येत असताना रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एमएच ३२ क्यू ९३०० ला पाठीमागून जोरदार धडकली. या अपघातात इंदापूर तालुक्यातील रामचंद्र शंकर जमदाडे (वय ४५ ) यांचा जागीच मृत्यु झाला तर संतोष पांडुरंग माने आणि बिपिन नारायण मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयातील उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा
