Advertisement

कार-दुचाकीच्या भिषण अपघातात एक ठार

प्रजापत्र | Thursday, 28/05/2026
बातमी शेअर करा

गेवराई दि.२८ (प्रतिनिधी): शिरूर कासार तालुक्यातील तिंतरवणीजवळील वडाचीवाडी येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना बुधवार (दि.२७) रोजी घडली असून या अपघातात दुचाकीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यु झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मयत व गंभीर जखमी हे कोणत्या गावचे रहिवासी आहेत, हे उशिरापर्यंत समजू शकले नाही.
     मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तिंतरवणीजवळील वडाचीवाडी येथे पुन्हा एक कार-दुचाकीचा भीषण अपघात झाला. ब्रेझा कार क्रमांक एम.एच.१४ जी.ए.००५९ ही भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम.एच.२३ ए.ए.७३९५ ला जोरदार धडक दिली.यात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कारने तब्बल चार पलट्या घेतल्याने कारमधील चार जण अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले. मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा कल्याण-विशाखापट्टणम महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
  

 
 

Advertisement

Advertisement