Advertisement

अज्ञात वाहनाने दुचाकीवरील तिघांना उडविले

प्रजापत्र | Sunday, 24/05/2026
बातमी शेअर करा

बीड (प्रतिनिधी)- अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरूणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना शनिवार (दि.२३) रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बीड - मांजरसुंबा रोडवरील पाली जवळ घडली. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
   बीड शहरातील मोमीन जुनेद मोमीन रफीक (वय २८ रा. मोमीनपुरा बीड) हा शेख फरमान (वय ३५, रा.तलवाडा, ता. गेवराई) मोमीन राहील (वय २० रा. इमामपूर रोड, बीड) या मित्रांसोबत दुचाकीवरून जेवणकरून बीडकडे येत होते. बीड-मांजरसुंबा महामार्गावरील पाली जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. तेथील नागरिकांनी त्यांना तातडीने रूग्णवाहिकेतून बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मोमीन जुनेद मोमीन रफीक यास तपासून मृत घोषित केले. या अपघातातील गंभीर जखमी शेख फरमान आणि मोमीन राहील या दोघांवर येथील खाजगी रूग्णालयात उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. या अपघातातील मयत मोमीन जुनेद यांचे बार्शी नाका भागातील हिना पेट्रोल पंपाजवळ भरोसा टी हाऊस नावाचे हॉटेल आहे. मोमीन जुनेद यांच्या अपघाती मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement