Advertisement

पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर! 

प्रजापत्र | Thursday, 11/02/2021
बातमी शेअर करा

बीड-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढतच जात आहेत.गुरुवारी (दि.११) सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. गुरुवारी पेट्रोलच्या दरात २४ ते २५ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलचे दर ३० ते ३१ पैशांनी वाढले आहेत. बीडमध्ये पेट्रोल ९५.४९ तर डिझेल ८४.७७ रुपयांच्या घरात गेले आहे.मुंबईमध्ये तर पेट्रोलच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. 
देशाची राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी पेट्रोल ८७.८५ रुपये प्रतिलीटर, तर मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर ९४.३६ रुपयांवर पोहोचले आहेत. अशीच परिस्थिती येत्या काळतही राहीली तर मुंबईत पेट्रोल लवकरच शंभरी गाठेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये डिझेलची किंमत प्रतिलीटर ७८.०३ रुपये इतकी झालीय. तर मुंबईत डिझेल प्रतिलीटर ८४.९४ रुपये इतकं महाग झालं आहे. 

 
कसे ठरतात पेट्रोल, डिझेलचे दर?
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किंमती, हे तेल भारतात आणण्यासाठी करण्यात येणारा खर्च, रुपयाच्या तुलनेतील डॉलरचा दर यानुसार इंधनाचा दर निश्चित होतो. यानंतर पेट्रोल, डिझेलचा दर २५ ते ३० रुपये प्रति लिटरपर्यंत जातो. पण त्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकारं त्यावर विविध कर लावतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची किंमत वाढत जाते. पेट्रोल, डिझेलची सध्याची किंमत पाहिली, तर त्यात करांचं प्रमाण तब्बल ६५ ते ७० टक्के इतकं आहे.

 
सर्वसामान्यांचं जगणं महागल 
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर महागाईने दिवसेंदिवस एक नवा उच्चांक गाठणे सुरु केले आहे.सोनं वगळता आज इंधन,किराणा,भाजीपाला,दूध या सर्वांचे दर वाढू लागले आहेत.सर्वसामान्यांचे वाढत्या महागाईमुळे जगणं अवघड झालं असून पेट्रोल लवकरच १०० रुपयांच्या घरात जाईल अशी शक्यता आहे.इंधनाचे दर वाढले की त्याचा परिणाम इतर जीवनावश्यक इतर वस्तूंवर ही होत आला आहे

Advertisement

Advertisement