Advertisement

शेतकरी बांधवांसाठी ‘हिरवे सोने’; धाराशिवात उभारला जातोय अत्याधुनिक बायोगॅस प्रकल्प

प्रजापत्र | Friday, 22/05/2026
बातमी शेअर करा

धाराशिव दि.२२(प्रतिनिधी):  जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी उत्पन्नाचा नवा आणि शाश्वत पर्याय ठरणारा ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ (CBG) प्रकल्प आष्टा येथे आकार घेत असून, हा प्रकल्प धाराशिवच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी क्रांती घडवेल, असा विश्वास आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आ.पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टा येथे अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित CBG प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या सहा महिन्यांत ६ TPD क्षमतेचा पहिला टप्पा कार्यान्वित होणार आहे. पहिला टप्पा पूर्ण होताच आणखी ६ TPD क्षमतेचा दुसरा टप्पाही सुरू करण्यात येणार आहे.
या प्रकल्पातून शेतीतील टाकाऊ अवशेष आणि नेपियर गवताचा वापर करून पर्यावरणपूरक बायोगॅस तसेच CNG निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे कृषी अवशेषांचे योग्य व्यवस्थापन होऊन प्रदूषण कमी करण्यास मदत होणार असून हरित ऊर्जेला मोठी चालना मिळणार आहे.
यासोबतच, ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांप्रमाणेच ‘नेपियर गवत उत्पादक शेतकरी’ आणि ‘CBG कंपनी’ यांच्यात एक मजबूत साखळी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना ऊस पिकापेक्षाही अधिक आणि हमखास उत्पन्न देणारा पर्याय उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात भविष्यात हरित ऊर्जेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न राहणार असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि जिल्ह्याला ‘ग्रीन एनर्जी मॉडेल’ म्हणून विकसित करणे हे उद्दिष्ट असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.समृद्ध आणि आत्मनिर्भर धाराशिवच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे,असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Advertisement

Advertisement