धाराशिव दि.२१(प्रतिनिधी): राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याला मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून भाजपचे नेते राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात भाजप संघटन मजबूत करण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल पक्षश्रेष्ठींकडून घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले यश हे राणाजगजितसिंह पाटील यांच्या संघटन कौशल्याचे फलित मानले जात आहे. ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढविण्यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करून त्यांनी भाजपला जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, पक्षीय स्तरावर सातत्याने केलेले काम, संघटन बांधणी आणि निवडणुकांमधील यश यामुळेच राणा दादांच्या नावाचा मंत्रिपदासाठी गांभीर्याने विचार सुरू आहे. जर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले, तर धाराशिव जिल्ह्याला अनेक वर्षांनंतर प्रभावी प्रतिनिधित्व मिळणार असल्याची चर्चा नागरिकांमध्येही रंगू लागली आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राणाजगजितसिंह पाटील यांना मंत्रीपद मिळाल्यास जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा
