Advertisement

मोटेगावकरला 'ब्रँड अँबेसेडर' करण्यासाठी 'पीटीए'चाच होता आटापिटा

प्रजापत्र | Thursday, 21/05/2026
बातमी शेअर करा
बीड दि.२०(प्रतिनिधी):नीटच्या  पेपर फुटी प्रकरणात लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक झाल्यानंतर आता मोटेगावकरचे बीड जिल्ह्यात असणारे स्नेहाचे संबंध समोर येत असून खाजगी क्लासेस चालकांची संघटना असलेल्या 'पीटीए'ने 'ब्रँड अँबेसेडर' म्हणून शिवराज मोटेगावकरला संघटनेच्या लेटरहेडवर घेतले होते. विशेष म्हणजे मोटेगावकरला संघटनेची फारशी आवश्यकता नव्हती, मात्र बीडमधून स्थापन झालेल्या 'पीटीए'लाच मोटेगावकरची आवश्यकता अधिक होती आणि राज्यातील अनेक सदस्यांचा विरोध असतानाही मोटेगावकरला संघटनेत घेतले गेले अशी देखील माहिती आता समोर येत आहे.
खाजगी कोचिंग क्लासेसची इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्यानंतर या क्लासेस चालकांना स्वतःच्या संरक्षणासाठी संघटनेची आवश्यकता वाटू लागली होती, तशा तर अनेक ठिकाणी अशा क्लासेस चालकांच्या स्थानिक संघटना होत्याच, मात्र  ही संघटना अधिक 'प्रोफेशनल' पद्धतीने व्हावी यासाठी काही वर्षांपूर्वी बीडमधून 'पीटीए' च्या नावाने राज्यव्यापी म्हणावी अशी संघटना स्थापन करण्यात आली होती. बीडमधून स्थापन झालेल्या या संघटनेचा 'ब्रँड अँबेसेडर' म्हणून शिवराज मोटेगावकरला घेण्यात आले होते. मोटेगावकरचा चेहरा वापरल्यावर संघटना आणि क्लासेसमधील 'प्रोफेशनल' वातावरण वाढेल असे त्यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांना वाटत होते, त्याहीवेळी कोल्हापूर, सांगली आदी भागातील काही सदस्यांनी मोटेगावकरची ब्याद सोबत नको असे सांगण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मोटेगावकर प्रेमींची 'पावर' जास्त असल्याने त्या गटाचा 'विजय' झाला आणि त्यातून शिवराज मोटेगावकरचे नाव पीटीएचा 'ब्रँड अँबेसेडर' म्हणून आल्याचे सांगण्यात येते.
विशेष म्हणजे पीटीएला जरी शिवराज मोटेगावकरची आवश्यकता वाटत होती, तरी मोटेगावकरला संघटनेबद्दल फारसे काही देणेघेणे नव्हते आणि संघटनेतील काही मोजके लोक सोडले तर मोटेगावकर संघटनेतील कोणाशी फारसे संबंध देखील जोपासत नव्हता, किंबहुना मोटेगावकरचा 'अहंपणा' संघटनेतील अनेकांना खुपत होता असे देखील आता संघटनेतील अनेक जण बोलून दाखवत आहेत. संघटनेच्याच काही संबंधितांनी 'प्रजापत्र'जवळ ही माहिती सांगितली. आता मोटेगावकरचे नीट पेपर फुटीप्रकरण उघड झाल्यानंतर पीटीएला मोटेगावकर 'ब्रँड अँबेसेडर' म्हणून नेमका कशासाठी हवा होता याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Advertisement

Advertisement