बीड दि.१९ (प्रतिनिधी): राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची शिकार करणाऱ्या चौघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना मांडवखेल येथे आज पहाटे घडली. यावेळी ग्रामस्थांनी चौघांनाही मृत मोर, मोरपिस व अन्य साहित्यासह ताब्यात घेऊन याची माहिती वन विभागाला दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चौघांनाही सर्व साहित्यासह वन विभागाच्या कार्यालयात आणले असून दुपारी उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
बीड तालुक्यातील मांडवखेल शिवारात काही संशयित मोरांची शिकार करण्यासाठी आले होते. मध्यरात्री ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना चौघे मोरांची शिकार करत असल्याचे दिसुन आले. ग्रामस्थांनी त्यांना मृत मोर व अन्य साहित्यासह तात्काळ ताब्यात घेतले. याची
माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत संबंधित चारही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना वन विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले असून दुपारी उशिरापर्यंत त्यांची चौकशीच सुरू होती. दरम्यान गुन्हा दाखल करण्यास आणखी दोन तास वेळ लागणार असून ते आपली नावे वेगवेगळी सांगत आहेत. त्यांच्या आधार कार्डवर वेगळीच नावे आहेत असा आम्हाला संशय असल्याने आम्ही त्यांची कसुन चौकशी करत सर्व कागदपत्र तपासत आहोत असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
