बीड दि.१७ (प्रतिनिधी): शेतात वावरतांना अंगावर माती उडाल्याच्या किरकोळ कारणावरून काल रात्री झालेल्या दोन गटातील वादाला आज सकाळी तुंबळ हाणामारीचे स्वरूप आले. दोन गटात झालेल्या तलवार आणि कुऱ्हाडीच्या हल्ल्यामध्ये २० जण गंभीर जखमी झाल्याची घटना बीड शहरापासून जवळच असलेल्या घोसापुरी येथे घडली. हल्ल्यातील जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून अनेकांच्या हाताला, डोक्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. दरम्यान आज सकाळी ७ वाजता ही घटना घडल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यातील जखमी थेट एसपी ऑफीसच्या दारातच जाऊन बसले. काही जखमी तर पायऱ्यांवर झोपले सुध्दा होते. या घटनेने खळबळ उडाली असून संपुर्ण गावात तणावपुर्ण शांतता आहे. या प्रकरणात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
बीड तालुक्यातील घोसापुरी येथे काल रात्री किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. यामध्ये काही जखमी झालेल्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री झालेल्या याच वादाचा वचपा काढण्यासाठी आज सकाळी ७.३० च्या सुमारास दुसऱ्या गटाने जोरदार हल्ला चढवला. दोन्ही गट हातात तलबारी आणि कुन्हाडी घेऊन समोरा समोर भिडल्याने घोसापुरी गावाला रणमैदानाचे स्वरूप आले होते. हल्लेखोरांनी महिला आणि लहान मुलांवरही दया दाखवली नाही. समोर दिसेल त्याला दोन्ही गटातील एकमेकांनी लाठ्या काठ्यांनी आणि तलवार, कुन्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही गटातील २० जण गंभीर जखमी झाले आहेत.

बातमी शेअर करा
