Advertisement

पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून पोटच्या मुलींना पेटवून देण्याचा प्रयत्न

प्रजापत्र | Tuesday, 05/05/2026
बातमी शेअर करा

माजलगाव दि.५(प्रतिनिधी) : पत्नी नांदायला येत नाही, या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या एका पित्याने आपल्या अवघ्या ४ आणि ५ वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथे घडली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 फिर्यादी अश्विनी महेश सोमासे (वय ३३, रा. टालेवाडी) या पतीसोबत झालेल्या किरकोळ भांडणामुळे सध्या माहेरी लहामेवाडी येथे राहत होत्या. २ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचे पती महेश विष्णू सोमासे हे दुचाकीवरून दोन्ही मुलींना घेऊन लहामेवाडी येथे आले. त्यांनी अश्विनी यांना "नांदायला चल" असे म्हटले, त्यावर अश्विनी यांनी गावातील प्रतिष्ठित माणसे घेऊन बैठक करून भांडण मिटविण्यास सांगितले.या बोलण्याचा राग आल्याने महेश सोमासे यांनी पत्नी आणि सासूला उद्देशून "तुला नांदायला पाठवले नाही, तर मी दोन्ही मुलींना डिझेल टाकून जाळून मारून टाकतो," अशी धमकी दिली. तितक्यावरच न थांबता त्यांनी दुचाकीला असलेल्या पिशवीतून पांढऱ्या रंगाचा डिझेलचा कॅन काढला आणि मृणाल (वय ५) व मृण्मय (वय ४) या दोन्ही चिमुरड्या मुलींच्या अंगावर डिझेल ओतले. त्यानंतर खिशातील काडीपेटी काढून मुलींना पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

नातेवाइकांमुळे टळला अनर्थ

यावेळी अश्विनी आणि त्यांच्या आईने आरडाओरडा केला असता, जवळच असलेले नातेवाईक आसाराम तान्हाबा चिंचोलकर हे धावून आले. त्यांनी महेश सोमासे यांच्या हातातील डिझेलचा कॅन आणि काडीपेटी हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. जाताना आरोपीने "नांदायला आली नाहीस तर तुला व माहेरच्या लोकांना जिवे मारून टाकीन," अशी धमकी दिली. या प्रकरणी अश्विनी सोमासे यांच्या फिर्यादीवरून पती महेश विष्णू सोमासे यांच्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement