धाराशिव दि.५ (प्रतिनिधी): जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाला नवी चालना मिळणार असून परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक अभियांत्रिकी शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
या हस्तांतरणामुळे महाविद्यालयाला शासनाची थेट मदत, निधी व धोरणात्मक पाठबळ मिळणार आहे. परिणामी, शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम होणार असून प्रयोगशाळा, ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम, संशोधन केंद्रे यांसारख्या पायाभूत सुविधा अद्ययावत केल्या जाणार आहेत. तसेच अनुभवी व पात्र प्राध्यापकांची नियुक्ती, अभ्यासक्रमातील सुधारणा आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. ग्रामीण व अर्धशहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक व भौगोलिक अडचणींमुळे उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण घेणे कठीण होते. मात्र या निर्णयामुळे तुळजापूर व आसपासच्या भागातील होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षण मिळणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ तयार होऊन रोजगाराच्या संधीही वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शासनाच्या या निर्णयाचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून स्वागत होत असून, महाविद्यालयाचे सक्षमीकरण होऊन ते भविष्यात एक आदर्श तांत्रिक शिक्षण संस्था म्हणून विकसित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

