भाजपचे अंग-बंग आणि कलिंग अर्थात बिहार,बंगाल आणि ओडिशामध्ये सत्ता मिळविण्याचे फार जुने स्वप्न होते, यातले बिहार भाजपसाठी तसे फार मोठे आव्हान नव्हते,ओडिशा देखील त्यांनी जिंकलेच,पण बंगाल भाजपला कोणत्याच अंगाने सोपे नव्हते.भाजपचे राजकारण धर्माधिष्ठित असले आणि पश्चिम बंगालमध्ये देखील तसे धार्मिकतेला महत्व असले तरी भाजपचे हिंदुत्व आणि पश्चिमबंगालची धार्मिकता यात मोठे अंतर होते. त्यातच पश्चिम बंगालची स्थानिक बंगाली अस्मिता भाजपला दीर्घकाळ साधता आली नव्हती, मात्र हे साधता यावे यासाठी भाजप आणि संघ परिवाराचे अथक प्रयत्न मागच्या दोन तीन दशकापासून सुरूच होते.त्यामुळेच भाजपचा आजचा विजय हा काही एका दिवसाचा नाही,तर यामागे अनेक वर्षांची रणनीती आणि सत्तेसाठी सत्तेच्याच माध्यमातून काहीही, कसेही करून घेण्याची मोदी शहांची 'राजनीती' या दोन्हींच्या एकंदरीत परिणामांचे यश म्हणून याकडे पाहायला हवे.
देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर एकदाचे लागले. या निकालांमध्ये आसाम, केरळम , पुद्दुचेरी यांचे निकाल तसे अपेक्षितच होते, त्यात फारसा काही बदल झाला नाही. केरळममध्ये काँग्रेस येणार हे अपेक्षितच होते, तर आसाम आणि पुद्दुचेरी भाजप सोडणार नव्हताच,तसाच कौल समोर आला.तामिळनाडूच्या निकालांनीं मात्र भल्याभल्यांना धक्का दिला. अगदी कोणताही राजकीय अनुभव नसलेल्या अभिनेत्याचा, काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेला पक्ष थेट सत्तेच्या जवळ जाऊन बसतो हे तसे अनाकलनीय आणि एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाला शोभावे असेच, ते केवळ दक्षिणेतच घडू शकते, त्यामुळे तामिळनाडूच्या निकालाचे आकलन व्हायला आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल.
पश्चिम बंगालच्या निकालांनी मात्र एकीकडे ममतांच्या राजकारणाला मोठा धक्का दिलेला असतानाच भाजपचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण केले आहे. प्रथमदर्शनी पश्चिम बंगालच्या निकालांचे श्रेय मोदी, शहांच्या सत्तेसाठी सत्तेच्या माध्यमातून काहीही करण्याच्या 'राजनीती' ला दिलेच पाहिजे. एसआयआरच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या हाताने मतदार याद्या शुद्धीकरणाच्या नावाखाली ६७ लाख मतदार कमी करण्याचा झालेला 'खेला' असेल किंवा पश्चिम बंगालच्या संदर्भाने मागच्या दोन-तीन वर्षांपासून ममतांना आक्रमक विरोध करतानाच हाती असलेल्या सर्व यंत्रणांचा वापर करून ममतांचा राजकीय चेहरा विद्रुप करून दाखविण्याचा प्रचार असेल, देशभरातील भाजपच्या रणनीती प्रमाणे विरोधकांकडे महत्वाचे नेते आपल्या पक्षात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ओढणे आणि त्यांच्याच हाताने मग विरोधी पक्षावर वार करण्याची खेळी आणि त्यात भाजपच्या हाती लागलेले शुभेन्दू अधिकारींसारखे लोक, हे भाजपचे समोर दिसणारे मागच्या काही वर्षातले राजकीय डाव होते, त्या डावांना यश मिळालेच. मात्र इतके मोठे सत्ता परिवर्तन हे काही या चार दोन डावांनी किंवा मागच्या चार पाच वर्षातील खेळ्यांनी निश्चितच झालेले नाही.
मुळात देशपातळीवर विचार केला तर प्रत्येक भागाच्या अस्मिता आणि ओळखी वेगळ्या आहेत.म्हणूनच भारताला विविधतेत एकटा असणारा देश म्हटले जाते. महाराष्ट्र,पंजाब,पश्चिम बंगाल किंवा दक्षिणेतील राज्ये यांच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्ययोत्तर देखील अस्मिता वेगवेगळ्या राहिलेल्या आहेत.पश्चिम बंगालची अस्मिता तशी संघर्षाची आणि बंगाली वर्चस्वाची राहिलेली आहे.बंगाली 'भद्र लोक' स्वतःच्या श्रेष्ठत्वाला कायम गोंजारत राहिलेला आहे.त्यामुळेच ज्यावेळी लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेमुळे देशातील अनेक राज्यात भाजपच्या हिंदुत्वाची लाट आली होती, त्यावेळीही बंगालने भाजपला स्वीकारले नव्हते, किंवा अगदी मोदींच्या राम मंदिराच्या लाटेतही बंगाल कधी भाजपचा झाला नव्हता,भाजपच्या 'रामाच्या' राजकारणाला बंगालमध्ये 'कालीमातेची' भक्ती हे उत्तर राहिलेले होते.त्यातच ममता बॅनर्जींचा लढवय्येपणा आणि आपल्या संघर्षाला बंगाली अस्मितेशी जोडण्याचे त्यांचे राजकारण दीर्घकाळ, म्हणजे सुमारे १५ वर्ष त्यांना सत्ता देऊन गेले.खरेतर सुरुवातीची काही वर्षे सोडली तर बंगालने काँग्रेसला देखील फारसे स्वीकारले नाही,अगोदर दीड दशकांपेक्षा अधिकची डाव्यांची सत्ता आणि नंतर ममता हीच बंगालची ओळख राहिली.मात्र हे सारे होत असताना भाजपने पाहिलेले अंग बंग आणि कलिंगचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी पेरणी आणि मशागत करत होता तो संघ परिवार.संघाच्या वैचारिक भूमिकेबद्दल दुमत किंवा मतमतांतरे असू शकतात,मात्र संघ परिवाराचे संघटनात्मक जाळे,त्याचे समर्पित कार्यकर्ते,त्यांचे सेवाकार्य समाजाला सांगण्याची पद्धत ही बलस्थाने आज तरी दुसऱ्या कोणत्या संघटनेकडे दिसत नाहीत.म्हणूनच बंगालच्या भूमीत बाहेरच्या अस्मिता घुसविण्याऐवजी संघाने योगी अरविंदांपासून ते अगोदरच्या काळात सुभाषचंद्र बोस आणि त्यानंतर विवेकानंद अधिकाधिक सांगण्याचा उपक्रम हाती घेतला.यांचेच विचार घेऊन संघ चालतोय हे दीर्घकाळ रुजवत रुजवत संघ परिवाराने पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागाची राजकीय मशागत केली आणि आपले बौद्धिक अखेर बंग जणांच्या आणि भद्रलोक म्हणविणाऱ्यांच्या देखील गळी उतरविलेच. त्याचाच परिणाम म्हणून आज भाजपला ममता बॅनर्जींच्या गडाला हादरा देता आला आहे. भाजपचे राजकारण देशात सर्वत्र तसे मतविभागणीचे राहिलेले आहे, पण पश्चिम बंगालमध्ये नकोसे मतदार काढून टाकणे आणि नंतरच्या म्हणजे उरलेल्या मतांचे ध्रुवीकरण करणे यावर भाजपने जोर दिला आणि सुमारे ४५ टक्क्यांच्या आसपास मतदान घेतले, यासाठीची 'नीती ' लोकशाही संकेतात बसते किंवा नाही याचा फारसा विचार न करता भाजपने वापरली आणि त्यात त्यांना यश आले. बाकी ममतांबद्दल निर्माण झालेली अँटी इन्कमबंसी,तरुण वर्गाला भाजपचे असलेले आकर्षण,शारदा चिटफंडसारख्या घोटाळ्यांच्या आरोपांनी तृणमूलचा फाटलेला चेहरा,सरकारी कर्मचाऱ्यांचा भाजपकडे असलेला ओढा,डाव्या पक्षांची आणि काँग्रेसची क्षीण झालेली शक्ती आणि त्यांना मानणाऱ्या समूहाला देखील हळूहळू आपल्याकडे ओढण्यात भाजपला आलेले यश असे अनेक पदर भाजपच्या बंग विजयाच्या वस्त्राला आहेत.

बातमी शेअर करा
