Advertisement

अन्न प्रशासनाची केजमध्ये डेअरीवर धाड

प्रजापत्र | Thursday, 18/06/2026
बातमी शेअर करा

बीड दि. १८ (प्रतिनिधी): अन्न प्रशासनाने केज तालुक्यातील उमरी फाटा येथील विशाल डेअरीवर १७ जून रोजी धाड टाकून कारवाई केली. तपासणीदरम्यान अत्यंत अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक वातावरणात हलवा व कलाकंद या खाद्यपदार्थांचे उत्पादन सुरू असल्याचे आढळून आल्याने सुमारे साडे सहा लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून संबंधित परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
   आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत डेअरीची सखोल तपासणी करण्यात आली. उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल तसेच तयार व साठवून ठेवलेल्या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये द्रवरूप ग्लुकोज, खुला खवा, सूर्या गोल्ड वनस्पती तूप, प्रीमियम गोल्ड हलवा (पांढरा) १६४२, प्रीमियम गोल्ड हलवा (तपकिरी) तसेच इंडियन स्वीट ट्रेडिशनल फूड स्वीट या पदार्थांचा समावेश आहे. घेण्यात आलेले सर्व नमुने १८ जून रोजी प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटी तसेच अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या उत्पादनामुळे संबंधित अन्नपदार्थांचा दर्जा संशयास्पद असल्याचे मानून ६ लाख ६८ हजार ४०९ रुपयांचा साठा पुढील आदेशापर्यंत जप्त करून ताब्यात ठेवण्यात आला आहे. तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.ही कारवाई सहआयुक्त एस. आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त व्ही. व्ही. पाटील, सहायक आयुक्त डी. व्ही. पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी कुचेकर तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अंकुश नरवाडे, श्री.गाढे आणि सी. सु. खंदारे यांच्या पथकाने केली.

 

Advertisement

Advertisement