Advertisement

इथून पुढे पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊ देणार नाही

प्रजापत्र | Thursday, 30/04/2026
बातमी शेअर करा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खा.सुप्रिया सुळे यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ देणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. महाराष्ट्रात २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातीलच दोन सदस्य एकमेकांच्या विरोधात लढले होते. लोकसभेची निवडणूक जास्त चुरशीची ठरली होती. पण आता यापुढे पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊ देणार नसल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींनादेखील उजाळा दिला. अजित पवार यांच्याशिवाय गेले तीन महिने कसे गेले? याविषयी देखील त्यांनी भाष्य केलं.
     "कुठल्याही कुटुंबाचा कर्ता पुरुष, व्यक्ती जेव्हा अचानकपणे जाते, ज्या भावना प्रत्येक घरात असतात, ते अर्थातच आमच्या घरात आहेत. एक फरक जाणवतो, आपण बाहेर जावून त्या भावना दाखवत नाहीत. आमच्या वडिलांची सर्वात मोठी खासियत आहे की, ते घरात आणि घराच्याबाहेर सारखंच वागतात. ते कधीही स्वत:च्या भावना फारशा कुणाला दाखवत नाहीत आणि ते खूप कमी बोलतात. त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललं आहे हे फार कमी लोकांना जाणवत असतं. जबाबदाऱ्या प्रत्येक असतात. अनेक कुटुंब आहेत ज्यांच्यावर असे प्रसंग आलेले आहेत आणि ताकदीने उभे राहून लोकांनी आपापल्या जबाबदाऱ्या पाळलेल्या आहेत. त्यामुळे नवीन कौतुक असं नाही. हा अडचणीचा, संघर्षाचा काळ सगळ्यांसाठी आहे. आता हमारी बारी आहे", असं सुप्रिया म्हणाल्या.

 

Advertisement

Advertisement