धाराशिव दि.३० (प्रतिनिधी): जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट आले आहे. त्यातच अतिवृष्टी आणि हवामानातील बदलांमध्ये जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसून आर्थिक नुकसान झाले आहे. कोकणातील हापूस आंब्यास नुकसान भरपाई दिली तशीच अर्थिक मदत केशर आंब्यास जाहीर करावी अशी मागणी आ.कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात काही वर्षात केशर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. येथील हवामान आणि भौगोलिक स्थानामुळे जिल्ह्यातील केशर आंब्याला विशिष्ट चव आणि गोडवा आहे. जिल्ह्यात केशर आंब्याचे क्षेत्र साडेचार हजार हेक्टर इतके आहे. येथील काही शेतकरी केशर आंबा निर्यात देखील करतात. यावर्षी बदलत्या हवामानाचा फटका आंबा बागांना बसला आहे. मोहर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार, फळमाशीचा प्रादुर्भाव तसेच गारपिटीमुळे यावर्षी आंबा उत्पादनात ८० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यामुळे येथील आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याच समस्येमुळे यावर्षी कोकणातील हापूस आंब्याला देखील मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने कोकणातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २२ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर करून वितरित देखील केली आहे. मात्र या समस्येमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने अजूनही मदत जाहीर केलेली नाही. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ.संजय पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील चार तालुक्यातील केशर आंबा बागांची कृषी विभागाच्या पथकासह पाहणी केली. त्यांनी देखील यावर्षी उत्पादनात पन्नास टक्के घट येत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यावर आधारित नुकसान भरपाईचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी कृषी आयुक्तालयाला पाठवला आहे. त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. कोकणच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर करावी. तसेच ज्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी फळबागेचा विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांना सरसकट फळपीक विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी आ .कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

प्रजापत्र | Thursday, 30/04/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
