Advertisement

माणुसकीचे दर्शन भर रस्त्यावर प्रसूती

प्रजापत्र | Saturday, 25/04/2026
बातमी शेअर करा

 पुणे: जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मानवतेचं हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळालं. शिरूर ग्रामीण रुग्णालयाजवळ एका गरोदर महिलेला अचानक प्रसूतीच्या तीव्र वेदना सुरू झाल्याने यावेळी ती रस्त्याच्या कडेला बसून मदतीची वाट पाहत होती. जोशीवाडी परिसरातील ही महिला रुग्णालयाकडे जात असताना वेदना असह्य झाल्या.

    परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी तत्काळ डॉ.सुनीता पोटे यांना संपर्क केला. या घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता डॉ.पोटे घटनास्थळी दाखल झाल्या. परिस्थिती पाहता तातडीने प्रसूती करणं आवश्यक असल्याचं त्यांनी ओळखलं. कोणत्याही वैद्यकीय सुविधांशिवाय, भर रस्त्यावरच त्यांनी धाडसी निर्णय घेत प्रसूती केली. या घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.दरम्यान, काही क्षण तणावपूर्ण वातावरणात सर्वजण प्रार्थना करत उभे होते. आणि अचानक नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला.त्या क्षणी सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याचं स्पष्ट होताच परिसरात आनंदाचे वातावरण पसरले. या प्रसंगात डॉ. सुनीता पोटे यांनी दाखवलेलं धैर्य, तत्परता आणि सेवाभाव यामुळे त्या खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरल्या. या घटनेने पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं असून डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement