Advertisement

 आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता

प्रजापत्र | Thursday, 23/04/2026
बातमी शेअर करा

मुंबई : मागील काही दिवसांपासून पश्चिमी विक्षोभामुळे (वादळामुळे ) राज्यातील काही भागांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीची नोंद होत आहे. तर काही भागात उष्णतेत वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस वादळाचा प्रभाव राज्यातील काही जिल्ह्यांवर राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून गुरुवारीही राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसासाठी तर काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट वातावरणामुळे ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

       राज्यात सध्या एकाच वेळी पावसाळी हवामान आणि तीव्र उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तसेच कमाल आणि किमान तापमानात मागील काही दिवसांपासून कोणतेही मोठे बदल झाले नसून नागरिकांना उन्हाची काहिली सहन करावी लागत आहे. विदर्भात हवामान कोरडे असून पुढील काही दिवस विदर्भातील काही जिल्यांमध्ये उष्णेतची लाटेसदृश्य स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.तर मध्य महाराष्ट्र्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील काही भागात पावसाची तर काही ठिकाणी गारपिटीची नोंद होत आहे. राज्यात वादळाची स्थिती असताना कमाल तापमानात काहीशी घट होऊन नागरिकांना तीव्र उन्हापासून दिलासा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, अनेक भागातील कमाल तापमानात फारसा बदल झाला नाही.यावर्षी पावसाळ्यात प्रशांत महासागरात ‘एल निनो’ ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागासह खासगी हवामान संस्थांनी व्यक्त केला आहे. ‘एल निनो’ विकसित झाल्यास त्याचा परिणाम भारतासह राज्याच्याही पावसावर होणार आहे. यामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, २५ ते २७ एप्रिल दरम्यान पुन्हा एक नव्या पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव उत्तर भारतावर राहील, अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. राज्यात २५ एप्रिलपर्यंत पावसाळी हवामान राहील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 

आज या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
पुणे, पुणे घाट विभाग, सातारा, सातारा घाट विभाग, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना गुरुवारी पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे तर मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरण राहील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेस या प्रदेशात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Advertisement

Advertisement