Advertisement

प्रियकराच्या पत्नीची प्रियसीकडून निर्घृण हत्या

प्रजापत्र | Wednesday, 22/04/2026
बातमी शेअर करा

 छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या बाजाजनगर परिसरातील साई श्रद्धा पार्क येथे एका महिलेने प्रियकराच्या पत्नीची घरात घुसून चाकू आणि पिस्तूलच्या सहाय्याने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना (दि.२२) एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
   मयत महिला साधना सोनपेटकर (वय ४०) रा. साई श्रद्धा पार्क, वडगाव कोल्हाटी अशी ओळख पटली असून त्यांचे पती महेंद्र सोनपेठकर हे मूळ लातूरचे असून गेल्या १० वर्षांपासून बजाजनगर येथे वास्तव्यास आहेत. तर आरोपी महिला शैला सोनार (वय ४५), रा. बजाजनगर हिला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महेंद्र सोनपेठकर आणि आरोपी शैला सोनार यांच्यात पूर्वी संबंध होते. मात्र काही कारणांमुळे हे संबंध कमी झाल्यानंतर आरोपी महिलेने महेंद्र यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतरही संबंध पूर्णपणे तुटल्याने संतापलेल्या आरोपी महिलेने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.घटनेच्या दिवशी सकाळी आरोपी महिला थेट महेंद्र यांच्या घरी पोहोचली. त्या वेळी घरात साधना सोनपेटकर आणि त्यांची आजी उपस्थित होत्या. तिघांमध्ये वाद झाला आणि झटापट सुरू झाली. यावेळी आरोपी महिलेने साधना यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखले. मात्र आजीने धाडस दाखवत पिस्तूल हिसकावून खिडकीतून बाहेर फेकून दिले.यानंतर संतापलेल्या आरोपीने सोबत आणलेल्या चाकूने साधना यांच्यावर वार केले. साधना खाली पडल्यावरही आरोपीने वार सुरूच ठेवले. या क्रूर हल्ल्यात साधना सोनपेटकर यांचा जागीच मृत्यु झाला. हल्ला इतका भीषण होता की साधना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्या.घटनेनंतर आरोपी महिलेने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी महिलेने घराचे दार आतून बंद केल्याने पोलिसांना दरवाजा तोडून आत प्रवेश करावा लागला. दरवाजा उघडताच आतले दृश्य पाहून पोलिसही हादरले.या कारवाईदरम्यान पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी महिला किरकोळ जखमी असून तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Advertisement

Advertisement