पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आले. त्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासातील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी व्हीआयपी प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेवर ताशेरे ओढले. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोठी चूक मानली जात असतानाच, आता स्वतः छगन भुजबळ यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिले असून, नेमकी काय परिस्थिती उद्भवली होती, याचा खुलासा केला आहे.
गावातील कार्यक्रमासाठी प्रशासनाने सर्व नियमांचे पालन करून स्वतंत्र हेलिपॅड सज्ज ठेवले. मात्र, हेलिकॉप्टर लँडिंगच्या वेळी पायलटचा मोठा गैरसमज झाला. कार पार्किंगसाठी ठेवलेली मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचे समजून पायलटने तिथेच लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. हेलिकॉप्टर खाली येत असताना पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या लोकांची आणि सुरक्षा रक्षकांची मोठी पळापळ झाली, अशी माहिती समोर आली. या सर्व प्रकरणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "हा अपघात वगैरे काही नाही. हॅलिकॉप्टरचे लँडिंग करताना पायलटला हेलिपॅड सापडले नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरावे लागले. सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आली. काळजी करण्याचे काहीही कारण नाही", असे ते म्हणाले.दरम्यान, पायलटच्या या हलगर्जीपणाबद्दल आता चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्यात आले, तिथे काही वाहने आधीच उभी होती. हेलिकॉप्टरच्या पंख्यांचा वेग आणि वाऱ्यामुळे आजूबाजूला धुळीचे लोट उसळले. मात्र, सुदैवाने: या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

