Advertisement

   'वंचित'चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चूल पेटवा’ आंदोलन

प्रजापत्र | Monday, 06/04/2026
बातमी शेअर करा

बीड दि.६ (प्रतिनिधी): राज्यात सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार (दि.६) रोजी ‘चूल पेटवा’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात भाकर, कांदा, टमाटर व मिरची देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शासनाचे लक्ष वेधले.
  आंदोलनकर्त्यांनी गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असलेल्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधले. गॅसच्या तुटवड्यामुळे घरातील शेगड्या थंड पडल्या असून चहाच्या टपऱ्या, रस्त्यावरील खाद्य स्टॉल्स बंद पडत आहेत. अनेक कुटुंबांना पुन्हा कोळसा व लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी अकोला येथे गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना माजी सरपंच शंकरराव शिरसाठ यांचा मृत्यू झाला, तर अमरावती येथेही एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करत आंदोलनकर्त्यांनी परिस्थितीची गंभीरता अधोरेखित केली. गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई तात्काळ थांबवावी, काळाबाजार रोखून दोषींवर कठोर कारवाई करावी, २५दिवसांनंतर गॅस मिळण्याची अट शिथिल करावी, विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावे, परिस्थिती कधी सामान्य होणार याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, केवायसी अडचणी दूर करून तातडीने गॅस पुरवठा करावा, उज्ज्वला योजनेचे जिल्हास्तरावर ऑडिट करावे यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी गॅस सिलेंडरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा आरोप करण्यात आला. काही ठिकाणी सिलेंडर ५ ते ७ हजार रुपयांना विकला जात असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले.या आंदोलनात वंचितचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, महासचिव खंडू जाधव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कवठेकर, युवक अध्यक्ष अनुरथ वीर, अर्जुन जोंजाळ, राजेश जोगदंड, रोहन मगर, पुष्पा तुरुकमारे राणी बचूटे, तालुका अध्यक्ष किरण वाघमारे, लखन जोगदंड, सतीश पायाळ, श्रीकांत वाघमारे, मिलिंद सरपते, संदीप जाधव, सुशील काकडे, धम्मानंद वाघमारे, प्रेम कांबळे, मोतीराम बचुटे, प्रफुल्ल बचुटे, जयराम काळे, शिवाजी वाव्हळकर, तुषार गायकवाड, पंचशीला वाव्हळकर, ऋषिकेश वाघमारे, आनंद शिंदे, कुमार साबळे, अमर ससाने, यश प्रधान यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Advertisement

Advertisement