बारामती : बारामती तालुक्यातील पणदरे, धुमाळवाडी, पवईमाळ परिसरावर अवकाळी पाऊस आणि भीषण गारपीटीने अक्षरशः कहर केला असून, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उभ्या पिकांची राखरांगोळी करत या नैसर्गिक संकटाने अनेक कुटुंबांच्या वर्षभराच्या कष्टांवर पाणी फेरले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बाधित शिवाराला भेट देत शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. पणदरे परिसरातील बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नुकसानाच्या तुलनेत शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी गणेश मुळीक, रोहन जगताप, कुलभूषण कोकरे यांसारख्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची व्यथा मांडली. या शेतकर्यांचे प्रत्येकी ५० लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. काही मिनिटांतच निसर्गाच्या तडाख्याने उभ्या पिकांचा चुराडा झाल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या कृषी विभागाने वेळीच पिकांची विमे उतरवले असते तर नुकसान भरपाई आम्हाला आता मिळाली असती, या समस्येकडे कुलभूषण कोकरे यांनी उपस्थित त्यांचे लक्ष वेधले.माळेगावचे संचालक योगेश जगताप म्हणाले, “सुनेत्रावहिनीसाहेब… काही क्षणांतच हिरवागार शिवार ओसाड झाला. केळी, आंबा, ऊस, चारा पिके आणि पालेभाज्या हातातोंडाशी आलेली सर्व पिके जमिनदोस्त झाली. गारांच्या माऱ्याने झाडांची पाने गळून पडली, फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत.” नुकसानग्रस्त शेतकरी रोहन जगताप म्हणाले, “वर्षभराचं स्वप्न डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालं. हातात आलेलं पीक गेलं… आता जगायचं कसं?” त्यांच्या या प्रश्नातच अनेक शेतकऱ्यांची हतबलता दडलेली होती.शेतकरी दशरथ धुमाळ यांनीही भावना व्यक्त करत सांगितले, “आधीच वाढत्या खर्चामुळे आम्ही अडचणीत होतो. या संकटाने आणखी घाव घातला आहे. माळेगाव कारखाना आणि कृषी विभागाने तातडीने मदत करून आमचे शिवार पुन्हा फुलवावे. या गारपीटीने केवळ पिकांचे नुकसानच केले नाही, तर शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांनाही तडा दिला आहे.शासनाच्या मदतीची अपेक्षा ठेवत शेतकरी पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

