महामानव, मग ते कोणतेही असोत, त्यांचे विचार समाजाला जोडण्यासाठी असतात. अशा महामानवांची स्मारके म्हणा किंवा पुतळे म्हणा, समाजाला त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरणा देत असतात हे मान्यच, पण असे असले तरी अशी स्मारके किंवा पुतळे बसविण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया असतात आणि त्या प्रक्रियांना बायपास करण्यासाठी म्हणून रात्रीतून अचानक पुतळे उभारणे ही त्या महामानवांच्या विचारांसोबत देखील प्रतारणाच असते. जे काम खरेतर वाजत गाजत व्हायला हवे ते गुपचूप, रात्रीतून करून घेण्यामागे नेमके कोणते राजकारण आहे आणि हे सर्व करताना सामाजिक अस्वस्थता वाढत असेल तर अशा कृती करण्याचे आणि अशा कृतींचे समर्थन करणारांचे गोडवे गायचे का याचा विचार अशा महामानवांवर, त्यांच्या विचारांवर प्रेम करणार्या सर्वानीच करायला हवा.
मागच्या काही काळात महाराष्ट्रात राजकारणासाठी कोणत्या गोष्टीचा वापर होईल याचा काही नेम राहिलेला नाही. राज्यातील सामाजिक अस्वस्थता सारखी वाढत असतानाच मागच्या कहाणी महिन्यात राज्याच्या गावागावांमध्ये अचानक महामानवाचे पुतळे बसविले जात आहेत. हे पुतळे बसविताना कोणत्याही परवानगीची गरज कोणाला वाटत नाही आणि दिवस उजेडता ‘हो हा पुतळा आम्ही बसविला’ असे उघडपणे सांगण्याची हिम्मत देखील कोणी दाखवत नाही ही या सार्या प्रकारामागची एक दुखरी बाजू आहे.
महामानव कोणतेही असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी असतील किंवा सावित्रीमाई, किंवा आणखी कोणी, या सर्वानीच समाजाला जोडण्याचा विचार दिला. त्यामुळे अशा महामानवांची स्मारके उभारायची असतील तर ती तितक्याच दिमाखदारपणे उभी केली गेली पाहिजेत. अशा महामानवाचे पुतळे गुपचूप उभारायचे आणि पुन्हा अमुक गावात हे महामानव अवतरले असले काही तरी समाजमाध्यमांमध्ये सांगायचे, हा त्या महामानवाचा विचार असूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्यामध्ये स्वराज्याच्या कायद्यांचे पुरेपूर पालन होईल याबद्दल कमालीचे दक्ष होते, आणि कोणीच या नियमांचे उल्लंघन करणार नाही अशी व्यवस्था त्यांनी निर्माण केली होती, मग आता त्यांचे किंवा आणखी कोणत्या महापुरुषांचे पुतळे उभारताना प्रचलित कायदे आणि नियम धाब्यावर बसविणे त्यांना तरी आवडले असते का? हा त्यांच्या विचारांशी केलेला द्रोह आहे असे कोणालाच वाटत नाही का?
पुतळे असतील किंवा स्मारके, ही समाजाला दिशा देण्यासाठी असतात, सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी आणि समाजाला एकसंघ करण्यासाठी असतात. मात्र कोणालाही विश्वासात न घेता किंवा कोणत्याच नियम किंवा इतर बाबींचा विचार न करता पुतळे उभारण्यातून सामाजिक सलोखा अधिकच बिघडणार असेल आणि अस्वस्थता वाढणार असेल तर यातून आपल्याला नेमके काय साधायचे आहे? यातून कोणाला कोणते राजकारण करायचे आहे का? आणि याचा एकूणच समाज व्यवस्थेवर कसा परिणाम होणार आहे, याबद्दल सरकार, विरोधीपक्ष, लोकप्रतिनिधी सारेच मूग गिळून गप्प का आहेत? खरेतर रोज कोणत्यातरी गावात रात्रीतून एखादा पुतळा उभारला जात असताना आणि पुन्हा त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे चित्र असताना सरकार आणि प्रशासन नावाची यंत्रणा झोपली आहे का झोपेचे सोंग घेऊन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे? असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रातील कोणत्याही सुसंकृत आणि महामानवांच्या विचारांवर चालणार्या सजग नागरिकाला पडत आहेत, मात्र यातील कोणताच प्रश्न नेते म्हणविणारांना पडत नाही, किंवा त्यांना यावर काही बोलून कोणालाच दुखवायचे नाही अशी त्यांची भूमिका असेल तर अशा सार्या प्रकारांना या व्यवस्थेचे मुकसमर्थन आहे असे समजायचे का? मागच्या दोन दिवसात किमान समाजमाध्यमांमध्ये काही लोकांनी तरी ‘सामाजिक अस्वस्थता वाढत असेल तर असे पुतळे आवश्यक आहेत का?’ असा सवाल विचारात आम्ही महामानवाचे वैचारिक वारसदार आहोत असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, अशा वैचारिक वारासदारांचा आवाज अधिक मोठा व्हावा आणि कोणालाच पुतळ्याचे राजकारण करण्याची संधी मिळू नये इतकीच अपेक्षा महाराष्ट्र ठेवून आहे.

