केज दि.३(प्रतिनिधी): मुलीला भेटायला लातूरला जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण येथील बस स्टँडवरून चोरीला गेले होते. त्यातील संशयित महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
केज शहरातील मंजुश्री जगदाळे या लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटायला जाण्यासाठी दि.१९ मार्च रोजी दुपारी केज येथील बस स्टँडवर थांबलेल्या असताना अज्ञात महिला चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण तोडून घेऊन फरार झाली होती.
या प्रकरणी मंजुश्री जगदाळे यांनी केज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून त्या गंठण चोराचा तपास करीत असताना सीसीटीव्ही मध्ये एक अनोळखी महिला मंजुश्री जगदाळे यांच्या माठीमागे उभी असल्याचे दिसत होती. तसेच ती बसमध्ये न चढता नंतर तेथून निघून गेल्याचे आढळून आले होते.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. बस स्टँड परिसरातील सी.टी.व्ही फुटेज मध्ये दिसत असलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित महिलेला बीड येथील माऊली नगर भागातून ताब्यात घेतले.तिने केज येथून चोरलेले मिनी गंठण देखील तिच्या ताब्यातून हस्तगत करून तिला केज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पो.ह.महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गित्ते, स्वाती मुंडे, वाहन चालक गणेश मराडे यांनी केली.

बातमी शेअर करा
