Advertisement

बेपत्ता महाराजांचा शोध लागला !

प्रजापत्र | Tuesday, 09/02/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले 
गेवराई-तालुक्यातील कोळगांव येथील सुर्यमंदिर संस्थानच्या मठाधिपतीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर रविवारी (दि.७)  हनुमान महाराज यांनी सुसाईट नोट आणि फेसबुकवर 'आपण पाच मिनिटात आत्महत्या करीत असल्याचा' व्हिडिओ व्हायरल केला होता.या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.मागील दोन दिवसांपासून महाराजांचा शोध घेणे सुरु असून मंगळवारी सकाळी हनुमान महाराज पंढरपूरमध्ये असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिल्याची माहिती आहे.मात्र असे असले तरी याला अद्याप पोलीस प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.       
                चकलांबा पोलीस ठाण्यात हनुमान महाराजांविरोधात विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर हनुमान महाराज यांनी (दि.७) रोजी सकाळी सुसाईड नोट लिहून सोशल मीडियावर आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला.यामध्ये त्यांनी आपल्याला याप्रकरणात अडकवले जात असून माझ्याकडून पाच लाख रुपये उकळण्यासाठी या प्रकारे कटकारस्थाने रचले जात असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते.दरम्यान व्हिडिओ व्हायरल करून महाराज बेपत्ता झाले.त्यानंतर रविवारी रात्री महाराज चौसाळा परिसरात असल्याच्या चर्चाना पेव फुटले.मात्र दोन दिवस उलटूनही महाराजांचा ठावठिकाणा लागला नव्हता.मंगळवारी चौसळ्यातील महाराजांच्या नातेवाईकांनी हनुमान महाराज आपल्याला भेटून गेले असल्याचे पोलिसांना सांगत ते पंढरपूर गेल्याचे सांगितले.दरम्यान पोलीस प्रशासनाकडून मात्र अद्याप तपास सुरु आहे.  

Advertisement

Advertisement