बीड दि.२६ (प्रतिनिधी)-काही दिवसांपूर्वी चकलांबा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांभोवती एसीबीने लाचेचा फास आवळला होता.याची सर्वत्र चर्चा देखील झाली.मात्र आता त्याच प्रकरणात आणखी एका कर्मचाऱ्याला 'डोस' देण्यासाठी एसीबीच्या नावावर एका खाजगी 'वैद्याने' केलेल्या लाखमोलाच्या 'बाळ'बोध संभाषणाची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरात सुरु आहे.या रोजच्या 'डोस'ला वैतागून त्या कर्मचाऱ्याने 'बाळ'बोध संभाषणाच्या रेकॉर्डिंग बनवल्या असून त्याच एसीबीच्या वरिष्ठांकडे पाठविण्याच्या हालचाली सुरु असल्याचे समजते.त्यामुळे एसीबी भोवतीच वादाचे वादळ निर्माण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बीडच्या पोलीस उपअधीक्षक म्हणून सोपान चित्तमपल्ले यांनी जबाबदारी घेतल्यानंतर लाचखोरांवर चांगल्या कारवाया केल्या.शंकर शिंदे यांच्यानंतर बीड जिल्ह्यात एसीबीचा धाक टिकविण्यासाठी ते प्रयत्न देखील करीत आहेत.चकलांब्यात गारगोटीच्या विक्री प्रकरणात पैशांची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधून तक्रार दिली होती.त्यानुसार याप्रकरणात विनोद सुरवसे याला पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले.तर संदीप पाटील यांची मागणी सिद्ध झाल्यामुळे त्याच्यावर आणि अशोक येळेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणात सध्या बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात संदीप पाटील व विनोद सुरवसे न्यायालयीन कोठडीत आहेत.आज या दोन आरोपींच्या जामीनबाबत निर्णय येणे अपेक्षित आहे. तर आता याच प्रकरणातील मूळ रेकॉर्डिंगचा संबंध जोडत आणखी एका कर्मचाऱ्याचा दरवाजा एसीबीच्या नावाखाली खट'खटवण्या'चा प्रकार झाल्याचे समोर आले आहे.यात एका खाजगी 'वैद्याने' संबंधित कर्मचाऱ्याशी 'बाळ 'बोध संभाषण करत काही मागणी घातल्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे या बाळबोध संभाषणाला वैतागून त्या कर्मचाऱ्याने या 'लाखमोलाच्या' संभाषणाची रेकॉर्डिंग केली असल्याचे देखील सांगितले जाते.विशेष म्हणजे या रेकॉर्डिंग एसीबीच्या वरिष्ठांना पाठविल्या जाणार असल्याची चर्चा असून यामुळे एसीबी भोवतीच वादाचे वादळ निर्माण होणार का काय? असा प्रश्न पडत आहे.सध्या तरी पोलीस आणि एसीबीच्या वर्तुळात खाजगी वैद्याच्या माध्यमातून झालेल्या लाखमोलाच्या 'बाळ'बोध संभाषणाच्या या कथित रेकॉर्डिंगची चर्चा जोरात आहे.

प्रजापत्र | Friday, 27/03/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
